वारजे - कर्वेनगर येथील गल्ली क्रमांक 02 मधील ज्ञानदीप सोसायटीत राहणारे जगदाळे कुटुंब. एकाच इमारतीत तिघे भाऊ आनंदात राहत होते. यामधील सर्वात लहान असणारा संतोष जगदाळे हे आपली पत्नी व मुलगी व त्यांचा मित्र कौस्तुभ गणबोटे व त्यांची पत्नी असे एकूण पाच जण जम्मू-काश्मीरला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तीनच दिवसापूर्वी गेले होते. मात्र कालच्या अतिरेकी हल्ल्याने त्यांच्या आनंदावर विरजन पडले.
संतोष जगदाळे यांना गोळ्या लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. तेथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांची पत्नी प्रगती संतोष जगदाळे, मुलगी आसावरी संतोष जगदाळे या सुखरूप आहेत.
जगदाळे कुटुंबीय तीन दिवसांपूर्वी एका खासगी कंपनीशी संबंधित गटासोबत काश्मीरला गेले होते. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, संतोष जगदाळे हे एक सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीत काम करतात. हे कुटुंब त्यांच्या बंगल्याच्या तळमजल्या राहतात. तर पहिल्या मजल्यावर संतोष यांचा भाऊ अविनाश व आई राहतात. त्यांचा दुसरा भाऊ अजय याच इमारतीत राहतात.
संतोष गेल्याने या जगदाळे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हसता खेळणारा माणूस तसेच कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने घरावर शोककळा पसरली आहे. संतोष यांना बाहेर फिरण्याची मोठ्या प्रमाणात आवड होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अरुणाचल प्रदेशाचा दौराही केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार संतोष जगदाळे यांना बुधवारी रात्री सव्वा अकरा वाजता पुणे विमानतळावरती आणण्यात येणार आहे. तेथून रात्रभर रुग्णालयातील शीतगृहात ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी सात ते साडे सातच्या दरम्यान कर्वेनगर येथील त्यांच्या घरी दर्शनासाठी नेण्यात येणार आहे.
गुरुवारी नऊ वाजता राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती संदीप खर्डेकर यांनी त्यांच्या नातेवाईकांना विचारून दिली आहे.