Dr Valsangkar Death Case : अखेरच्या चिठ्ठीतील सही वळसंगकरांची नाहीच, त्या दाव्याने न्युरोसर्जनच्या आत्महत्येला वेगळं वळण
Saam TV April 24, 2025 03:45 AM

Solapur Dr Shirish Valsangkar Death Case : सोलापुरातील न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात दररोजस नवे आणि खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. या आत्महत्या प्रकरणाला मनीषा माने हिच्या जबाबाने वेगळं वळण मिळाले आहे. पोलीस कोठडीत असणाऱ्या मनीषा माने-मुसळे हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात सुसाइड नोटबाबत गंभीर दावा केला आहे. सुसाइड नोटवरील सही ही डॉ. शिरीष वळसंगकर यांचीच नाहीच असा दावा मनीषा हिने केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा हिने पोलिसांच्या जबाबात डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या सुसाइड नोटबाबत धक्कादायक खुलासा केलाय. मनीषाने सांगितले की, नोटवरील सही ही डॉ. शिरीष वळसंगकर यांची नाहीच. कारण डॉक्टर पूर्ण नाव आणि वडिलांचं नाव लिहून सही करायचे. त्याशिवाय हे मराठीत कधीच लिहीत नव्हते. दरम्यान, डॉ. शिरीष वळसंगकर यांची शेवटची चिठ्ठी पोलिसांनी जप्त केलेली आहे. त्या चिठ्ठीतील शब्दांची अक्षरतज्ज्ञांकडून पडताळणी अद्याप करण्यात आलेली नाही.

सकाळ पेपरने दिलेल्या बातमीनुसार ने पोलिसांच्या तपासात सांगितलं की, डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या कुटुंबात बराच काळ अंतर्गत वाद सुरू होता. त्यांच्या मुलगा डॉ. अश्विन, सून डॉ. सोनाली आणि स्वतः डॉ. वलसंगकर यांच्यातील मतभेदांमुळे रुग्णालयात काम करताना अनेकदा संभ्रम व्हायचा. या तणावातूनच तिने तिघांना ई-मेल पाठवून राजीनामा देण्याचा विचार केला होता. मात्र, डॉ. वलसंगकर यांनी तिला बोलावून समजावलं आणि तिने माफीनामा लिहून दिला. त्यानंतर ती घरी गेली, पण पुढे काय घडलं हे तिला माहीत नाही. तिने असंही सांगितलं की, डॉ. अश्विन आणि डॉ. वलसंगकर यांच्या सहीत बरंच साम्य आहे. मनीषाचा दावा आहे की तिला या प्रकरणात खोटं गोवण्यात आलं आहे. मनीषाच्या दाव्यामुळे डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला वेगळं वळण मिळाले आहे. पोलिसांकडून डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मुलाचा आणि सूनेचाही जबाब नोंदवला आहे. सदर बाजार पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.

मनीषा मुसळे-मानेची कोठडी वाढवली -

सोलापूर येथील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात आरोपी मनीषा मुसळे-माने हिला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांकडून तिच्याविरोधात 27 नवीन तक्रारी दाखल झाल्या असून, या तक्रारींची तपासणी आणि प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत 23 एप्रिल 2025 पर्यंत कोठडी वाढवली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.