पुणे : जम्मू व काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातील प्रवाशांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम राबविली आहे. त्याअंतर्गत हवाई वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून दोन विमानांची सोय करण्यात आली आहे. गुरुवारी पर्यटकांना घेऊन श्रीनगरहून विशेष विमान मुंबईच्या दिशेने उड्डाण करेल. दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान दोन्ही विमान मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत. यात सुमारे १०० पर्यटक हे पुण्यातील रहिवासी आहेत. दोन्ही विमानांत सुमारे १८३ पर्यटक असतील.
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. यात २८ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर जम्मू व काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक जण आपल्या घरी परतण्यासाठी इच्छुक आहेत. त्याच्या मदतीसाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन विशेष विमानांची सोय केली आहे. इंडिगो व एअर इंडिया या कंपन्यांचे प्रत्येकी एक विमान गुरुवारी श्रीनगरहून मुंबईला येणार आहे. यासाठी प्रवाशांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. विमान प्रवासाचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे. गुरुवारी दुपारपर्यंत विशेष विमान मुंबईत दाखल होईल. मुंबईत परतल्यानंतर पुण्यातील पर्यटक रस्ता मार्गे पुण्यात दाखल होतील.
कंपन्यांच्या दरवाढीला चापदहशतवादी हल्ला झाल्यानंतर लागलीच काही तासांत विमान कंपन्यांनी श्रीनगरहून दिल्लीसाठीच्या तिकीट दरात भरमसाट वाढ केली. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करून लागलीच विमान कंपन्यांच्या प्रमुखांना दरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करायची नाही, असा आदेश दिला. त्यांनतर विमान कंपन्यांनी केलेली दरवाढ मागे घेतली.
विमान कंपन्यांनी दरवाढ करू नये, असा आदेश दिला आहे. शिवाय जम्मू व काश्मीरमध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी विशेष विमानांची सोय केली आहे. गुरुवारी व शुक्रवारीदेखील श्रीनगरहून विशेष विमानांची सोय केली आहे.
मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री.