Kolhapur News : कोल्हापूर हादरलं! पार्टीदरम्यान झाला मोठा राडा; जुन्या वादातून तरुणाला धारदार शस्त्राने भोसकून संपवलं
Saam TV April 25, 2025 02:45 AM

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात भरदिवसा गुंडाची हत्या झाल्याची घटना ताजी असताना कोल्हापुरातही खळबळजनक घटना घडली आहे. कोल्हापुरातील शिवाजी पेठेत तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. कोल्हापुरातील तरुणाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे.

कोल्हापुरातल्या शिवाजी पेठेत रंकाळ्याच्या समोर तरुणाची निघृण हत्या करण्यात आली आहे. प्रशांत कुंभार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. नरेंद्र राजाराम साळुंखे याने खंजीरने कुंभारला भोसकल्याची माहिती समोर येत आहे. ही माहिती कुंभारच्या मित्राने पोलिसांना दिली.

नेमकं काय घडलं?

संध्यामठ गल्लीतील एका हॉलमध्ये रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पार्टी सुरु होती. कुंभार आणि साळुंखे यांच्या गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु आहे. जुना वादच टोकाला गेला. मित्रांनी रक्तबंबाळ अवस्थेतच प्रशांत कुंभारला उपचारासाठी गाडीवरून नेलं. त्याचाही व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत गु्न्हा नोंदवण्यात आला आहे. या हत्या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

सांगलीत भरदिवसा कुख्यात गुंडाची हत्या

इस्लामपुरात आज गुरुवारी एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत कुख्यात गुंड नितीन पालकरची भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. गुन्हेगारी जगतात दबदबा असलेल्या नितीन पालकरची भरदुपारी हत्या झाली आहे. एका पान टपरीजवळ थांबलेला असताना गुंड नितीन पालकरची हत्या झालीये. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि मारामारी सारखे अनेक गुन्हे दाखल होते. त्याच्यावर इस्लामपूर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाईही केली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.