-rat२४p१४.jpg-
P25N59623
लांजा ः संस्कृती फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत जावडे येथील आश्रमशाळेत वर्धापन दिन साजरा केला.
---
आश्रमशाळेतील गरजू विद्यार्थ्यांना साह्य
बारावा वर्धापनदिन ; उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २४ ः सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे आपल्या कार्याचा ठसा उमटणाऱ्या संस्कृती फाउंडेशन लांजा रत्नागिरी या संस्थेचा नुकताच बारावा वर्धापनदिन आश्रमशाळेतील २१० गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन साजरा करण्यात आला.
या वर्धापनदिनाच्या निमित्ताने महात्मा गांधी दुय्यम विद्यालय उमरे रत्नागिरी या माध्यमिक शाळेला २५ हजार रुपयांचे ढोलपथक, सह्याद्री शिक्षणसंस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल कोसरी या माध्यमिक शाळेच्या ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, कै. रा. सि. बेर्डे माध्यमिक विद्यालय सापुचेतळे या माध्यमिक विद्यालयाला रुपये १२ हजार किमतीचे स्टॅन्ड फॅन, मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी या माध्यमिक विद्यालयाच्या ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य अशाप्रकारे एकूण साधारणपणे ३ लाख रुपयाचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ओंकार असरेकर व नंदिनी परपट्टेदार यांच्या माध्यमातून हे साहित्य देण्यात आले. सांस्कृतिक फाउंडेशन लांजा गेली बारा वर्षे सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव काम करत आहे. नैसर्गिक आपत्ती गरजू विद्यार्थ्यांना मदत त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रात आतापर्यंत १२८ नाट्यप्रयोग, ४५ संगीतसंध्या, राज्यभरात विविध एकांकिका स्पर्धांमध्ये एकांकिकांचे सादरीकरण व पारितोषिके, नाट्यशिबिरे, एकपात्री अभिनय स्पर्धा, पुष्प महोत्सव, एकांकिका महोत्सव, एकांकिका लेखन स्पर्धा, मान्यवरांच्या मुलाखती, कोकणातील लोककलांचा प्रचार आणि प्रसार, शिक्षण, क्रीडा, कला, समाज या क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवले आहेत.