ढिंग टांग : पनौती और पडोसी..!
esakal April 25, 2025 11:45 AM

फ्रॉम धी डेस्क ऑफ धी वझीरे आजम ए पाकिस्तान, टु जनाब जनरल मुहम्मद असीम मलिक, हेड- ए- आईएसआई, यांसी, इन्शाल्ला, असीममियां, रातभर सोया नहीं हूं. हे खुफिया खतसुध्दा पायखान्यात दडून बसून लिहीत आहे. काल रात्रीपासूनच हाजमा साफ बिघडला आहे.

तुम्ही लोकांनी हिंदोस्तांच्या सरजमींवर काय भानगड करुन ठेवली आहे? पहलगाममध्ये जो काही हादसा झाला, त्यामुळे हिंदोस्तांच नव्हे, तर जगभरातून मला फोन येत आहेत. इतनी गालियां-ए-गंदगी मी जनम में खाल्ल्या नव्हत्या. शेवटी फोन बंद करुन बसलो. पण बंद फोनमधूनही शिव्या ऐकू येत आहेत.

हिंदुस्तानी लोकांच्या शिव्यांचे मला इतके काही वाटत नाही. पण काही शिव्या मराठी जुबानमधल्या ऐकू आल्या. परवरदिगार, कितनी खौफनाक गालियां!! कुछ भी सुनो, लेकिन मराठी गालियां कभी मत सुनो!

कितीही सोचले तरी तुमच्या कल्पना-ए-दिमागमध्ये येणार नाही, अशी सजा आता आम्ही देऊ, असे हिंदोस्तांचे वझीरे आजम नरिंदर मोदी यांनी म्हटले आहे. इस शख्स का भरोसा नही. वो जो बोलते है वो करते है, और जो नहीं बोलते, वो डेफिनिटली करते है, ऐसा मैनें सुना है. वक्त-ए-पिछला (पक्षी : मागल्या टायमाला) घुस के मारेंगे असे हे जनाब मोदी म्हणाले होते. इन्शाल्ला, ठंडी पडली तर अजूनही थोडे दुखते!..

तुम आईएसआईवाले कुछ ना कुछ कालाकांडी करते हो, और भुगतना हमे पडता है. आधीच आपला मुल्क कंगाल झाला असून कर्जे में डूबा है. हिंदोस्तांशी पंगा घेतल्यावर तर कटोरा घेऊन हिंडावे लागणार असे दिसते. जल्द से जल्द लाहौरला येऊन भेटा, आणि रिपोर्ट करा.

शहाबाज शरीफ ऊर्फ जहांबाज बदमाश,

वझीरे आजम, पाकिस्तान.

मेहेरबान वझीरे आजमसाहब, लाख लाख दुआएं. तुम्ही पायखान्यातून लिहिलेले खुफिया खत मीसुध्दा पायखान्यात बसूनच वाचले, आणि जबाबसुध्दा पायखान्यातूनच देत आहे. क्या बताऊं? माझाही हाजमा ठीक नाही. कालपासून इथेच मुक्काम आहे, आणि पुढले काही दिवस याच तीन बाय चारच्या कमऱ्यात काढावे लागणार असे दिसते. रहने दो, याने की असो.

काही अतिउत्साही लौंडे पहलगामला गेले आणि हातातला खिलौना त्यांनी इस्तेमाल केला, एवढेच घडले. २६ जानें जागच्याजागी गेली, त्याच्यावर हिंदोस्तांमध्ये केवढा गहजब माजला. जनाब, माणसे मेली तर इतके काय बिघडते, हेच मला समजत नाही! आईएसआईचे हेच तर काम आहे. स्वत: बिळात लपून बसायचे, आणि निहत्थ्या, मासूम माणसांना मारायचे, या बहादुरीच्या कामात आपली खुफिया एजन्सी आईएसआई माहीर आहे. हां या ना?

मेरी सलाह मानो, तुम्ही हिंदोस्तांच्या वझीरे आजमना खत लिहा, आणि सांगा की, आमचा काहीच वास्ता नाही. ‘खाया नही, पिया नही, गिलास तोडा बारा आना’ अशी आमची हालत आहे. बाकीचे खत थोड्या वेळाने लिहितो. कळ येते आहे!

आपका असीम मलिक, आईएसआई.

वझीरे आजम जनाब शरीफसाहब, बचा लो, अब हमारी जान बचा लो!! हिंदोस्तांने आपल्या मुल्काचे पाणी तोडले असून आणखीही बरेच काही तोडले आहे. उरलेले येत्या काही दिवसात तुटेल, असेही सांगत आहेत.

पनौती आणि पडोसी हे नशिबाचा भाग असतात. दुर्दैवाने हिंदोस्तांच्या नशिबी दोन्ही एकच आहे. वेळ पडलीच तर आपण कुठल्या मुल्कात पळायचे, याची आयडिया द्याल का?

कळावे. आपला.

जनरल सय्यद मुनीर शाह, लष्करप्रमुख, पाकिस्तान.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.