पाकिस्तानच्या निर्णयाचे त्यालाच भोगावे लागणार परिणाम, दोन्ही देशांमधील अन्य करारही स्थगित
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताने सिंधू जलवितरण करार स्थगित केल्यानंतर आता पाकिस्ताने 1972 मध्ये दोन्ही देशांमध्ये झालेला ‘सिमला करार’ स्थगित केला आहे. पाकिस्तानच्या दृष्टीने जीवन-मरणाचा प्रश्न असलेला हा जलकरार स्थगित झाल्यामुळे हताश आणि हतोत्साहित झालेल्या पाकिस्तानने जरी सिमला करार स्थगित करुन भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला असला तरी, हा प्रयत्न पाकिस्तानच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1971 मध्ये युद्ध झाले होते. या युद्धात भारताचा विजय झाला होता आणि पाकिस्तानचे तुकडे होऊन बांगला देश स्वतंत्र झाला होता.
त्यानंतर 1972 मध्ये भारताच्या तत्कालीन नेत्या इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे नेते झुल्फीकार अली भुत्तो यांच्यात शांतता चर्चा होऊन सिमला करार करण्यात आला होता. या करारानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पश्चिम सीमा निर्धारित करण्यात आली होती. मात्र, ती गुजरात, राजस्थान आणि पंजाब या तीनच राज्यांपुरती मर्यादित करण्यात आली होती. काश्मीरची सीमारेषा मात्र अधिकृतरित्या निर्धारित करण्यात आली नव्हती. सिमला करार हा महत्वाचा असला तरी तो स्थगित झाल्याने भारताला हानी होण्याची शक्यता नाही. उलट पाकिस्तानचीच सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असे विचार व्यक्त होत आहेत.
भविष्यकालीन संबंधांसाठी करार
सिमला करार हा दोन्ही देशांच्या भविष्यकालीन संबंधांसाठी करण्यात आला आहे, असे त्यावेळी घोषित करण्यात आले होते. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या वादांवर चर्चेने तोडगा काढला जावा, दोन्ही देशांमध्ये युद्धे होऊ नयेत आदी उद्देशांसाठी तो करण्यात आल्याचे प्रतिपादन करण्यात आले होते. तथापि, त्या करारानंतरही दोन्ही देशांमध्ये 1999 मध्ये युद्ध झाले होते. तसेच या करारानंतरच पाकिस्तानने भारताशी थेट युद्ध न करता दहशतवादाच्या माध्यमातून भारतात आणि विशेषत: काश्मीरमध्ये हिंसाचार आणि रक्तपात घडविण्याचे सत्र सुरु केले होते. हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद थांबविण्यासाठी हा करार कुचकामी ठरला आहे. त्यामुळे सध्या या कराराची स्थिती एक ‘मृत करार’ अशीच आहे, असेही मत अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांनी व्यक्त केले आहे. असा करार स्थगित करुन पाकिस्तानच्या हाती काहीही लागणार नाही. उलट, भारतासाठी पाकिस्तानने उचललेले हे पाऊल सोयीचे ठरु शकते, असेही काही तज्ञांचे मत आहे.
कराराचा वारंवार भंग
सिमला करार दोन्ही देशांमध्ये स्थायी शांतता प्रस्थापित करण्यासाठी कुचकामी ठरला आहे. पाकिस्तानने असंख्यवेळा या कराराचा भंग केला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आतून भारतीय सैन्यावर गोळीबार पाकिस्तानकडून जवळपास प्रतिदिन करण्यात येतो. हा करार असतानाही पाकिस्ताने काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उपस्थित केला आहे. त्यामुळे भारतालाही तसेच प्रत्युत्तर द्यावे लागले आहे. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाला तर या करारात उत्तरच नाही. त्यामुळे या कराराचा आता फारसा उपयोग राहिला नाही, असे अनेकांचे मत आहे.
कराराची मुख्य तत्वे