जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून या घटनेनंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडवर आलंय. पाकिस्तानची कोंडी करून त्यांचा नाक दाबण्यासाठी भारताकडून विविध महत्वाची पावलं उचलली गेली आहेत. केंद्राने केलेली कारवाई पाहून दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानमध्ये घबराटीटे वातावरण पसरलं आहे. भारत कधीही हल्ला करू शकतो, अशी पाकिस्तानला भीती आहे. याच दरम्यान त्यांनी त्यांच्या दहशतवादी आकांना लपवण्याचे कामही सुरू केले आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय दहशतवादी सूत्रधार, लष्कर प्रमुख हाफिज सईद आणि दहशतवादी मसूद अझहर यांना लपवत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला हाफिज सईदवर हल्ला होण्याची भीती आहे. ISIने हाफिज सईदला लष्करी छावणीत लपवले आहे. तो अबोटाबादमधील आयएसआयच्या सेफ हाऊसमध्ये दडी मारून बसला आहे. त्याला जराही बाहेर काढण्यात येत नाहीये. पाकिस्तानची सध्या इतकी पाचावर धारण बसली आहे की, 27 एप्रिल रोजी मुरीदके येथे होणारा हाफिजचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. एवढेच नाही तर दहशतवादी मसूद अझहरही हल्ल्याच्या भीतीने भूमिगत झाला आहे. मसूद अझहरला आयएसआयने बहावलपूरमध्ये लपून ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान मोदींनी काय दिला इशारा ?
या हल्ल्यानंतर संपूर्ण देशाचं रक्त खवळलं आहे. हल्लेखोरांवर आणि त्यांच्यामागे असलेल्या कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. यानंतर काल पंतप्रधान मोदींनी बिहारमधील सभेत बोलताना थेट इशारा दिला. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि दहशत पसरवणाऱ्यांना थेट इशारा दिला. दहशवाद्यांना जमीनीत गाडलं जाईल, कट रचणाऱ्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळणार असे मोदी म्हणाले. तेव्हापासून पाकिस्तानची भीतीने गाळण उडाली आहे. ” या हल्ल्यात काहींना आपला मुलगा गमावला. काहींनी आपला भाऊ गमावला. कोणी आपला जीवनसाथी गमावला. त्यातील अनेक जण देशातील वेगवेगळ्या भाषा बोलत होते. त्या सर्वांच्या मृत्यूवर आमचा आक्रोश, दु:ख एक सारखे आहे.. हा हल्ला म्हणजे भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचा प्रकार आहे. ज्यांनी हा हल्ला केला, त्या अतिरेक्यांना आणि या हल्ल्याच्या कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल. दहशतवाद्यांच्या आकांची कंबर तोडल्याशिवाय राहणार नाही. अतिरिक्यांचे नामोनिशान मिटवणार ” असा थेट इशारा मोदींनी कालच्या भाषणात दिला.
हाफिज सईदने केली TRFची स्थापना
दरम्यान, पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी बंदी घातलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटने स्वीकारली आहे. ही संघटना पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदच्या पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (LET) ची सहयोगी मानली जाते. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामागील गट लष्करचा एक भाग म्हणून 2019 मध्ये टीआरएफ उदयास आली. काश्मीरमध्ये दहशतवादी घटना घडवून आणण्यासाठी ही, पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचे आयएसआयचे एक साधन असल्याचे बोलले जात आहे. ही संघटना ऑनलाइन नेटवर्कद्वारे तरुणांची भरती करण्यात तसेच खोऱ्यात शस्त्रास्त्रे आणि ड्रग्जची तस्करी करण्यात सहभागी आहे. हाफिज सईदच्या माध्यमातून आयएसआय या संघटनेचे पालनपोषण करत आहे.
कोण आहे मसूद अजहर ?
तर जैश-ए-मोहम्मद (JeM) चा संस्थापक मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केले आहे. या दहशतवाद्याने 2001 मध्ये भारतीय संसदेवर हल्ला केला होता आणि 2009 मध्ये झालेल्या 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा तो मास्टरमाइंड देखील आहे. 2016 साली झालेल्या मध्ये पठाणकोट हल्ल्याचा आणि 2019 मध्ये पुलवामा हल्ल्याचा तो मास्टरमाइंड आहे. त्याने आपल्या दहशतवादाने अनेक निष्पाप लोकांचे जीव घेतले आहेत. याच कारणामुळे तो भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. अपहरण झालेल्या इंडियन एअरलाइन्स फ्लाइट ८१४ (IC८१४) मधील प्रवाशांना वाचवण्याच्या कराराचा एक भाग म्हणून डिसेंबर १९९९ मध्ये भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांची सुटका केली.