नागपूर - सायबर पोलिसांनी बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात वापरलेल्या आयपीचा ‘आयडीपीआर’ काढला आहे. त्यात ५८० नव्हे तर ६२२ शिक्षकांच्या बनावट आयडी तयार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे सर्वच शिक्षक आता चौकशीच्या घेऱ्यात असल्याचे दिसून येते.
सायबर पोलिसांना मिळालेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी नीलेश वाघमारे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक केली. तक्रारीच्या अनुषंगाने सायबर पोलिसांनी उल्हास नरड यांच्या आयडीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या बनावट शालार्थ आयडी आणि त्यासाठी वापरण्यात आलेल्या ‘आयपी’चा अभ्यास सुरू केला.
सुरुवातीला ५८० शिक्षकांचा सहभाग असल्याचे आढळले. मात्र, तपासात त्यातून हजारो आयपी तयार करून त्या माध्यमातून बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, त्याबाबत ‘एनआयसी’कडून डेटा मागविल्यावर आयपी बाबतचा डेटा पोलिसांच्या हाती आला आहे.
त्यातून कितीदा आयपी नव्याने जनरेट झाला याची माहिती समोर येताच, आयपीचा ‘आयडीपीआर’ तपासण्याची प्रक्रिया सुरू केली. या प्रक्रियेतून प्रकरणात नेमका कुणाचा सहभाग आहे, हे आता पोलिसांच्या हाती आले आहे. यामध्ये जवळपास ६२२ शिक्षकांचा बनावट शालार्थ आयडी तयार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे येत्या काळात या सर्वच शिक्षकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार आहे.
शिक्षण विभागाकडून दिरंगाई
सायबर पोलिसांकडून यापूर्वी ५८० शिक्षकांची माहिती मागविण्यात आली. मात्र, त्यापैकी आता पर्यंत ७५ शिक्षकांची कागदपत्रे शिक्षण विभागाकडून सादर करण्यात आली. त्यामुळे ५०५ शिक्षकाची माहिती सादर करण्यात आली नाही. मात्र, आता सायबर पोलिसांनी अजून ११७ शिक्षकांबाबत माहिती मागविली आहेत. ही सर्वच नावे आयडीपीआरमध्ये असल्याचे दिसून येते.