आयपीएल 2025 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादला पराभवाच्या मालिकेनंतर विजयाची चव चाखता आली आहे. स्पर्धेतील 43व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला 19.5 षटकात सर्वबाद करत 154 धावांवर रोखलं. सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी 155 धावांचं आव्हान होतं. हे आव्हान सनरायझर्स हैदराबादने 19 व्या षटकात पूर्ण केलं. सनरायझर्स हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली. अभिषेक शर्माला या सामन्यात खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर ट्रेव्हिस हेड आणि इशान किशन यांच्या खांद्यावर धुरा होती. पण ट्रेव्हिस हेडही काही खास करू शकला नाही. ट्रेव्हिस हेड 19 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला हेनरिक क्लासेनही फक्त 7 धावा करून तंबूत परतला. दुसरीकडे, इशान किशनने एकाकी झुंज सुरु ठेवली होती. त्याने 34 चेंडूत 44 धावा केल्या आणि बाद झाला.
अनिकेत वर्मा 19 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. तेव्हा संघाच्या 13.5 षटकात 106 धावा झाल्या होत्या. त्यामुळे संघाला 49 धावांची गरज होती. यावेळी कामिंदू मेंडिस आणि नितीश कुमार रेड्डीने विजयी भागीदारी केली. कामिंदू मेंडिसने 22 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. यात त्याने 3 चौकार मारले. तर नितीश कुमार रेड्डीने 13 चेंडूत नाबाद 19 धावा केल्या. यात त्याने 2 चौकार मारले. यासह सनरायझर्स हैदराबादने 18.4 षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं.
आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आतापर्यंत 9 सामने खेळली असून 3 सामन्यात विजय आणि 6 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. या विजयासह सनरायझर्स हैदबात 6 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. अजूनही प्लेऑफच्या आशा जिवंत आहेत. उर्वरित पाच पैकी पाच सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेऑफच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. चेन्नईला 9 पैकी फक्त 2 सामन्यात विजय मिळाला असून 4 गुण आहेत. आता उर्वरित पाच सामन्यात विजय मिळवला तरी इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे.