कुसूर : नांदणी टोल नाक्याजवळ भोपाळहून (मध्यप्रदेश) कर्नाटकात दोन प्रवासी बॅगेत गांजा घेऊन निघालेल्या दोघांना मंद्रूप पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून आठ लाख ३८ हजार रुपयांचा ३३ किलो गांजा व २२ लाख रुपयांचा टेम्पो, असा एकूण ३० लाख ३८ हजार ३७५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी अटक केलेल्या दोघा संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलिस कोठडी मिळाली.
सोलापूर - विजयपूर महामार्गावर मंगळवारी पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली. मंद्रूप पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पीएसआय चंद्रकांत कदम व त्यांचे सहकारी मंगळवारी रात्री सोलापूर-विजयपूर महामार्गावर गस्त घालत होते. तेव्हा पहाटे चार वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली की नांदणी येथील टोलनाक्याजवळ एक टेम्पो थांबलेला आहे. त्यामधून गांजा सारखा वास येत आहे.
तेव्हा सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांना त्यांनी याची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस गेले. तेव्हा टेम्पोत दोघेजण झोपले होते. त्यांना नावे विचारली असता जगदीश नन्नुलाल मेहर (वय ३९, रा. मिसरोड, शाहू मोहल्ला, भोपाळ, मध्य प्रदेश) व बादशाह लतीफ खान (वय ३७, रा. रत्नागिरी, जुग्गी राशन रोड, भोपाळ, मध्यप्रदेश) अशी नावे सांगितले. यावेळी त्यांच्या ताब्यातील टेम्पोची (एम.पी.०४ सी.६२/टी.सी ०४१२) तपासणी केली असता दोन प्रवासी बॅगा आढळल्या.
त्या उघडून पाहिले असता त्यामध्ये गांजा होता. नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, पोलिस निरीक्षक मनोज पवार,पोलिस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांनी या गांजाचा पंचनामा केला. तेव्हा या दोन्ही बॅगमध्ये प्लास्टिक बांधून भरलेला ३३ किलो ५४० ग्रॅम गांजा आढळला. यामध्ये आठ लाख ३८ हजार रुपयांचा ३३ किलो गांजा व २२ लाख रुपयांचा टेम्पो, असा एकूण ३० लाख ३८ हजार ३७५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली.