Amit Shah : एकही पाकिस्तानी नको; गृहमंत्री अमित शहांचे राज्यांना निर्देश
esakal April 26, 2025 03:45 AM

नवी दिल्ली - पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध आक्रमकपणे कारवाईला सुरवात केली आहे. याअंतर्गत गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यांत वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना शोधण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने निश्चित केलेल्या मुदतीनंतर एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहू नये, असे शहांनी म्हटले आहे.

पाकिस्तानला अद्दल शिकविण्याचा निर्धार व्यक्त केलेल्या भारत सरकारने पाकिस्तानी नागरिक आणि अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्यास फर्माविले आहे. त्याचाच पुढील भाग म्हणून अमित शहा यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढण्यास सांगितले. गृहसचिवांनी आज राज्यांच्या मुख्य सचिवांशी संवाद साधत पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढण्याच्या मोहिमेला वेग आणण्याच्या सूचना केल्या आहेत.

दुसरीकडे, सीमेवरील तणाव वाढला असून शुक्रवारी पहाटे पाकिस्तानच्या लष्कराने केलेल्या गोळीबारास भारतीय जवानांनी देखील सडेतोड प्रत्युत्तर दिले. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे जम्मू-काश्मीरला रवाना झाले आहेत. ते ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या पहलगामला देखील भेट देण्याची शक्यता आहे.

भारतीय लष्कराने आज दोन हल्लेखोर दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली. दक्षिण काश्मीरमध्ये स्थानिक संशयित दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. भारतीय हवाई दल, नौदलाने युद्धाभ्यास सुरू केला असून त्यामध्ये राफेल विमानेही सहभागी झाली आहेत.

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज जम्मू-काश्मीरला जात या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांची विचारपूस केली. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनाही ते भेटले. दहशतवाद्यांनी कितीही हल्ले केले तरीसुद्धा आम्ही त्यांना पराभूत करून दाखवू असा निर्धार राहुल यांनी यावेळी बोलून दाखविला.

हकालपट्टीच्या प्रक्रियेस वेग - मुख्यमंत्री

‘महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. ‘महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस ठाण्याला याबाबत सूचना दिली जात आहे.

कोणताही पाकिस्तानी नागरिक ४८ तासांपेक्षा अधिक काळ राज्यात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे,’ असे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान २३२ प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. आतापर्यंत सुमारे ८०० पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत.

वैद्यकीय व्हिसाला सवलत

पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारताने पहिल्या टप्प्यात सिंधू पाणीवाटप करार स्थगित करण्यासह वाघा-अटारी सीमा बंद करणे, पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील सैन्य सल्लागारांची हकालपट्टी करणे आणि पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत मिळालेले व्हिसा तातडीने रद्द करणे यासारख्या उपाययोजना आखल्या आहेत.

यासोबतच पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व विद्यमान वैध व्हिसा २७ एप्रिल २०२५ पासून रद्द करण्यात आले आहेत. त्यांना दिलेले वैद्यकीय व्हिसा फक्त २९ एप्रिल २०२५ पर्यंत वैध राहतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.