Heatstroke : उष्माघात – लक्षणे, कारणे आणि प्राथमिक उपचार
Marathi April 26, 2025 09:25 AM
दिवसेंदिवस तापमानात वाढ होत चालली असून राज्यात उष्णतेची लाट उसळली आहे. तीव्र उन्हाच्या झळाळीमुळे डोकेदुखी, थंडी, डिहाड्रेशन, उष्माघात यासारख्या आरोग्याच्या गंभीर तक्रारी जाणवत आहेत. उष्माघात शरीराच्या वाढलेल्या तापमानामुळे होणारी एक गंभीर समस्या आहे. उष्माघातावर त्वरीत उपचार करणं गरजेचं असते, नाही तर हे जीवघेणंही ठरू शकते. त्यामुळे प्रखर उन्हामुळे होणाऱ्या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आज आपण जाणून घेऊयात, उष्माघाताची लक्षणे, कारणे आणि त्यावरील प्राथमिक उपचार
उष्माघात होण्याची कारणे
- उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे.
- कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे.
- दुपारच्या वेळी दुचाकी वाहनावरून प्रवास करणे.
- जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे.
- घट्ट कपड्यांचा वापर करणे.
उष्माघाताची लक्षणे …
- थकवा येणे.
- ताप येणे.
- त्वचा कोरडी पडणे.
- भूक न लागणे.
- चक्कर येणे.
- निरुत्साही होणे.
- डोके दुखणे.
- रक्तदाब वाढणे.
- मानसिक बेचैन व अस्वस्थता.
- बेशुद्धावस्था.
उष्माघातवरील प्राथमिक उपचार –
- रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे.
- खोलीत पंखे, कुलर सुरू करावेत. तुम्ही रुग्णाला वातानुकुलित खोलीतही ठेवू शकता.
- रुग्णाच्या शरीराचे तापमान कमी करण्याचे प्रयत्न करावेत.
- रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी.
- रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. तुम्ही आईसपॅकही ठेवू शकता.
- प्रथमोपचाराने फरक पडला नाही किंवा रुग्ण बेशुद्ध असेल तर रुग्णाला तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करावे.
- गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने शीरेवाटे सलाईन देणे फायद्याचे ठरेल.
उष्माघात कसा रोखाल?
- दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे.
- महत्त्वाच्या कामासाठी दुपारी घराबाहेर निघत असाल तर गॉगल्स, छत्री, टोपी वापरावी.
- प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
- उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसंच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा.
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा.
- अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा त्रास होण्याची लक्षणे आहेत. त्यामुळे अशी लक्षणे दिसत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- माणसांप्रमाणे गुरांना ही उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. गुरांना छावणीत ठेवावे. तसेच त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे.
- घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करावा.
- थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.
- कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
- सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्याचे कामगारांना सूचित करावे.
- पहाटेच्यावेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा.
- बाहेर कामकाज करताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा.
- गरोदर महिला, कामगार आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी.
- रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत.
- जागोजागी पाणपोईची सुविधा उभारावी.
- लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.
- दुपारी 12 ते 4 कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
- जीन्स सारखे गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
- पांढरे किंवा फिकट रंगाचे ढगळ, सुती कपडे वापरा.
- बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
- उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.
हेही पाहा –