ऐश्वर्या खरे - अभिनेत्री
माझी आई निश्चितपणे मला माहिती असलेली सर्वांत कणखर स्त्री आहे. ती माझी सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टिम आहे. मी भोपाळ सोडून माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीसाठी मुंबईला आले, तेव्हा तिनं मला खूपच सांभाळून घेतलं. असाही काही काळ होता, जेव्हा मला या मोठ्या शहरात हरवून गेल्यासारखं वाटायचं; पण फोनवर निव्वळ तिचा आवाज ऐकला, की वाटायचं सगळं काही ठीक आहे. ती माझ्यासाठी माझा भावनिक आधारस्तंभ, माझी सगळ्यात मोठी चिअर लीडर आणि अनेक मार्गांनी माझ्यासाठी माझी ‘सेफ स्पेस’ आहे.
माझी आई कायमच आमच्या कुटुंबाचा कणा राहिली आहे. शांत, कणखर आणि अगदी स्थिर. अगदी गोंधळातही शांतता निर्माण करण्याची अद्भुत क्षमता तिच्यामध्ये आहे. मी तिचे आभार मानते, की ज्यामुळे आमचे घर हे आमच्यासाठी कायमच सुविधा आणि सुरक्षित जागा राहिलेले आहे. तिनंच आम्हाला एकत्र राहायला, एकमेकांवर खोलवर प्रेम करायला आणि आव्हानांचा सामना करायला शिकवलं आहे. आज आमचं कुटुंब जे कणखर, प्रेमळ आणि विनम्र आहे, त्याला आकार आईच्या मूल्यांमुळे मिळाला आहे.
मी सध्या ‘झी टीव्ही’वरील ‘भाग्यलक्ष्मी’ मालिकेमध्ये लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. आज मी जे काही आहे, त्याचं बरंचसं श्रेय माझ्या आईलाच जातं. ती भोपाळमध्ये रेडिओ जॉकी म्हणून काम करायची आणि आपल्या शोजसाठी मन लावून काम करताना तिला पाहत मी लहानाची मोठी झालं आहे. तिच्या आवाजात एक प्रकारची जादू होती, ज्यामुळे तुम्हाला छान वाटायचं, हसू यायचं आणि डोळ्यांत अश्रूही तरळायचे. मला वाटतं अभिनय करण्यावरील माझं प्रेम ही मला तिच्याकडूनच मिळालेली देणगी आहे.
तिनंच मला कथाकथन, संगीत, चेहऱ्यावरील हावभाव अशा गोष्टींशी ओळख करून दिली. आमचं घर नेहमीच तिचे रेडिओ शोज, जुनी हिंदी गाणी आणि ती करत असलेल्या स्क्रिप्ट्सच्या सरावाच्या आवाजानं भरलेलं असायचं. त्याच वातावरणानं माझ्या बालपणाला आकार दिला आणि अभिनयावरील माझ्या उत्कट प्रेमाची बीजं रोवली. आजही जेव्हा मी ‘भाग्यलक्ष्मी’मधील लक्ष्मीच्या भूमिकेसाठी तयारी करत असते, तेव्हा मी लहानपणापासून तिचा आवाज ऐकताना जाणवलेला स्पष्टपणा, आत्मविश्वास आणि भावना यांचाच वापर करते, असं मला वाटतं.
आईच्या सहनशक्तीबद्दल माझ्या मनात अतिशय आदर आहे. तीन-तीन मुलींसह असलेल्या घरामध्ये प्रचंड आवाज आणि गोंधळ असणं स्वाभाविक आहे. कठीण दिवसही अनेकदा आले; पण तिनं कधीही आपल्या मनाची स्थिरता सोडली नाही. अगदी कठीण काळातही तिच्या चेहऱ्यावरील हसू कधीच कमी झालं नाही. एक व्यक्ती आणि एक कलाकार म्हणून तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रकाशाचा काही अंश माझ्यात यावा, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असते.
आईबद्दल असा एक क्षण आहे, जो कायम माझ्यासोबत राहील. मी शाळेत असताना आमच्या घराजवळच्या छोट्याशा दुकानात चांदीच्या झुमक्यांची जोडी पाहिली होती. ते अगदी साधे असले, तरी मला अतिशय आवडले होते. त्याबद्दल मी फक्त एकदा तिला बोलले. काही महिन्यांनी माझ्या वाढदिवशी तिनं मला एक छोट्याशा डबीमध्ये ते झुमके भेट म्हणून दिले. मला अक्षरशः भरून आलं होतं. तिच्या ते लक्षात तर राहिलंच होतं; पण माझी ती छोटीशी इच्छा पूर्ण करण्यासाठी तिनं थोडं-थोडं करत पैसेही साठवले होते. माझ्याकडे ते झुमके आजही आहेत. मला शक्तीची गरज भासते किंवा मी कोण आहे आणि मी कुठून आले आहे, याची आठवण होते, तेव्हा मी ते झुमके घालते.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)