विकी कौशलच्या (vicky Kaushal) 'छावा' (Chhaava ) चित्रपटाने आतापर्यंत 600 कोटींच्या वर कमाई केली आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट अनेक कारणांमुळे कायम चर्चेत राहीला. अलिकडेच मराठी अभिनेता आस्ताद काळेने (Aastad Kale) 'छावा' चित्रपटाबद्दल आपले मत मांडले होते. तो म्हणाला होता की, 'छावा वाईट फिल्म...' त्याच्या या पोस्टमुळे तो चांगलाच चर्चेत आला.
मराठी अभिनेता काळेने नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत 'छावा' चित्रपट आपल्याला का आवडला नाही याचा खुलासा केला आहे. तसेच चित्रपटातील आवडत्या बाजू आणि खटकलेल्या गोष्टींचाही त्याने स्पष्ट उल्लेख केला आहे. तो नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात.
'' चित्रपटातील आवडीच्या गोष्टी सांगताना आस्ताद काळे म्हणाला की, "मला चित्रपटातील विकी कौशलचा अभिनय खूप आवडला. विकी कौशलने चित्रपटासाठी खूप कष्ट घेतले आहेत. त्याने खूप प्रमाणिकपणे काम केले आहे. मी स्वतः काही प्रसंगांमध्ये कौशलसोबत काम केले आहे. तसेच मला चित्रपटाचा सेट खूपच आवडला. सेट अप्रतिम होता. तर युद्धाचे काही प्रसंग देखील खूपच छान झाले होते.मात्र फक्त याच गोष्टी म्हणजे चित्रपट नाही असे माझे मत आहे. "
'छावा' चित्रपटातील खटकलेल्या सीनबद्दल बोलताना आस्ताद म्हणाला की, "चित्रपटात ऐतिहासिकदृष्ट्या काही सीन समस्यात्मक आहेत. बुऱ्हाणपूरची लूट आणि मग राज्याभिषेक या दोन्ही घटना उलट घडल्या होत्या. प्रथम महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि मग बुऱ्हाणपूरची लूट झाली. तुम्ही का इतिहासाची प्रतारणा करता? त्या काळात महाराजांनी येसूबाईंच्या नावाचा शिक्का केला होता ही किती मोठी गोष्ट आहे. हे का नाही चित्रपटात दाखण्यात आले?"
'छावा' चित्रपटातील स्वतःच्या भूमिकेबद्दल आस्ताद म्हणाला की, "'छावा' चित्रपटासाठी मला कास्टिंगसाठी फोन आला तेव्हा माझं हो… नाही… असे चालू होत. मला पूर्ण स्क्रिप्ट दिले नव्हते. माझे पात्र काल्पनिक होते. सुर्याजी निकम असे पात्र इतिहासात होऊन गेले नाही. मी त्यांनी आधी माझा चित्रपटातील सीन पाठवण्यास सांगितले पण त्यांनी या गोष्टीला नकार दिला. मग सेटवर गेल्यावर समजलं की, फक्त दीड वाक्य आहे. आता सर्व तयारी झाली असताना मी नाही कसे बोलणार कारण माझी तशी शिकवण नाही."