शलाका तांबे - लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
आपण दररोज अनेक निर्णय घेत असतो; काय खायचे, कुठे जायचे, यांसारखे छोटे निर्णय ज्यांना आपण ‘routine choices’ असे म्हणतो. मोठे निर्णय, उदाहरणार्थ, कोणता अभ्यासक्रम निवडायचा, कोणते करिअर निवडावे, नोकरी बदलायची का, नवीन घर घ्यायचे का, मुलांसाठी कोणती शाळा निवडावी, इन्व्हेस्टमेंट नक्की कुठे करायची, हे सर्व मोठे निर्णय आपले आयुष्य कुठल्या दिशेने जाणार हे ठरवतात. म्हणूनच निर्णयक्षमता (डिसिजन मेकिंग स्किल) हे फार महत्त्वाचे जीवनकौशल्य आहे. योग्य निर्णय आपल्या जीवनात सुख, शांती, आनंद आणि समृद्धी आणू शकतात, तर चुकीचे निर्णय जीवनात अस्थिरता निर्माण करू शकतात. आपल्या जीवनाची गुणवत्ता आपल्या निर्णयांवर अवलंबून असते. ‘The quality of our decisions, influences the quality of our life’.
दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या निर्णयांचा प्रभाव तात्कालीन असू शकतो; पण आयुष्यातल्या मोठ्या निर्णयांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर, कुटुंबावर, करिअरवर होत असतो. प्रत्येक व्यक्तीला जीवनात वेगवेगळ्या टप्प्यांवर या पाच प्रकारच्या निर्णयांना सामोरे जावे लागते.
शैक्षणिक निर्णय
करिअरबद्दलचे निर्णय
आर्थिक निर्णय
वैयक्तिक निर्णय (रिलेशनशिप्स, स्वतःच्या आवडीनिवडी यासंबंधित)
आरोग्याशी संबंधित, जीवनशैलीशी संबंधित निर्णय
हे निर्णय आपल्या आयुष्याची दिशा ठरवतात, आणि गुणवत्ताही ठरवतात. म्हणून हे निर्णय योग्यरित्या घेण्यासाठी आपली निर्णयक्षमता विकसित करायला हवी.
निर्णयक्षमता विकसित करण्याचे प्रभावी मार्गआधी माहिती, मग निर्णय
‘Information is power’, हे वाक्य आपण नक्कीच ऐकले असेल. निर्णय घेण्याआधी शक्य तितकी माहिती गोळा करा. आपल्याकडील पर्याय बघा आणि त्यातील फक्त तुमच्यासाठी योग्य असलेलेच पर्याय पुढील चिंतनासाठी शॉर्टलिस्ट करा. त्या प्रत्येक पर्यायाचे फायदे आणि धोके यांचा विचार करा. इतरांचा अनुभवही जाणून घ्या. तुम्हाला ज्या विषयासंबंधित निर्णय घ्यायचा आहे त्यातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अंधारात अंदाज लावण्यापेक्षा कधीही माहितीच्या प्रकाशात निर्णय घ्यावा.
क्षमतांचे योग्य आकलन
शैक्षणिक आणि करिअर संबंधित निर्णयांमध्ये, तुम्हाला वैयक्तिक क्षमतांचे योग्य आणि प्रामाणिक आकलन करणे आवश्यक असते. तुमच्या नैसर्गिक स्ट्रेंथ्स आणि वीकनेसबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ्स आणि मर्यादा यांच्याबद्दल योग्य जाण असेल, तर लक्ष्यप्राप्तीमध्ये अडथळे कमी येतात आणि यशाची संभावना वाढते. तुम्हाला ज्या क्षेत्रात रुची आहे, त्यासाठी नवीन काय शिकणे गरजेचे आहे, आणि ते तुम्हाला अत्ता कसे शक्य आहे किंवा शक्य नाही त्याची माहिती मिळवणे आवश्यक आहे. आर्थिक निर्णय घेतानाही तुमची वर्तमान आर्थिक क्षमता यांचे आकलन, आणि निकटच्या भविष्यकाळातील आर्थिक क्षमतेबद्दलचे आराखडे, या गोष्टी खूप आवश्यक असतात.
भावना आणि तर्क यांचा ताळमेळ
‘भावनेच्या आहारी जाऊन कधी निर्णय घेऊ नये’, हा उपदेश आपण सगळ्यांनीच ऐकला आहे, किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीला दिलाही आहे. राग, भीती, अतिउत्साह, किंवा शंका-कुशंका, अशा भावनांच्या प्रभावात येऊन घेतलेले निर्णय सहसा उपयुक्त ठरत नाहीत. कोणताही महत्त्वाचा निर्णय हा तर्कसंगत, वस्तुस्थितीची जाणीव ठेवून आणि उपलब्ध परिणाम यांच्यावर आधारित असावा. परंतु याचा अर्थ असाही नाही, की भावनाविरहित निर्णय घ्यावेत. निर्णयप्रक्रियेत भावनांचा देखील सकारात्मक सहभाग असणे आवश्यक आहे. भावना आपल्याला आपल्या ‘inner voice’बरोबर कनेक्टेड ठेवतात. भावना आणि तर्क यांचा जेव्हा ताळमेळ बसतो, तेव्हा तो खरा ‘सारासार विचार’ असतो, असे म्हणायला हरकत नाही.
निर्णयांची जबाबदारी
आपण मोठे होत असतो, तेव्हा घरातील वरिष्ठ मंडळी आपल्याकडून एक अपेक्षा करत असतात - ‘जबाबदारी घ्यायला शिका’; पण मग जबाबदारी घ्यायला आपण कसे शिकतो? तर आपल्या निर्णयांमधून. ‘decision making is that skill which makes you more responsible.’ निर्णय घेणे म्हणजे, निवड करणे आणि त्या निवडीच्या परिणामांबद्दल जबाबदार असणे. त्यासाठी हे ध्यानात ठेवायला हवे, की आपला प्रत्येक निर्णय प्रत्येक वेळेला अगदी शंभर टक्के योग्य असेल असे नाही. आपले निर्णय कधी बरोबर असतील, तर कधी निर्णय घेण्यामध्ये चूकही होऊ शकते. आपण मनुष्य आहोत, आणि मनुष्य चुकांमधून देखील शिकतो आणि यशामधून बोध देखील घेऊ शकतो. म्हणून निर्णय आणि त्या निर्णयाची पूर्ण जबाबदारी घेणे, हे निर्णयक्षमतेचे एक महत्त्वाचे मापदंड आहे असे म्हणायला हरकत नाही.
छोट्या निर्णयापासून सुरुवात आणि सराव करणे
निर्णयक्षमता हे कौशल्य आपल्याला विकसित करायला लागते. ते जन्मजात मिळालेले नसते. निर्णयक्षमता देखील योग्य सरावामधूनच विकसित होते. ‘complex decision making’ म्हणजेच अनेक वेगवेगळ्या गोष्टींबाबत, आणि परिस्थितींमध्ये आपल्याला निर्णय घ्यावे लागत असतात. ‘माझा निर्णय चुकला तर?’ या भीतीमुळे कधी कधी आपण निर्णय घेत नाही. याला इंग्रजीत decision paralysis किंवा choice paralysis असे म्हणतात. प्रत्येक निर्णयामधून आपण काहीतरी नक्कीच शिकू शकतो आणि त्यामुळे निर्णयक्षमतेमध्ये वाढ होणार आहे, तेव्हा आपण निर्णय घ्यायला घाबरत नाही, आणि आपण सकारात्मकपणे निर्णय घ्यायला लागतो. आवश्यक हे आहे, की निर्णय घेण्यासाठीची योग्य प्रक्रिया, त्याबद्दलची जागरूकता आणि त्या प्रक्रियेचा नियमित सराव.
‘life is a series of choices and decisions’ आणि निर्णयक्षमता हे असे महत्त्वाचे जीवनकौशल्य आहे- जे सरावाने विकसित करता येते. विचारपूर्वक, माहितीवर आधारित आणि भावनांना नियंत्रित ठेवून घेतलेले निर्णय आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात.