महापालिकेच्या बैठकीत मूर्तीकारांमध्ये हाणामारी
पीओपीवरून वाद चिघळला; बाटल्या, खुर्च्या फेकल्या
मुंबई, ता. २५ : महापालिकेकडून शाडूच्या व ‘पीओपी’च्या मूर्तीकारांची शुक्रवारी (ता. २५) बोलावण्यात आलेल्या बैठकीत मूर्तीकारांमध्येच हाणामारी झाली. बैठक सुरू होण्याआधी शाडू मातीपासून मूर्ती साकारणारे मूर्तिकार आणि पीओपीचे कारागीर एकमेकांना भिडले. पाण्याच्या बाटल्या, खुर्च्या एकमेकांसमोर फेकण्यात आल्या. या वादातच बैठक पार पडली. बैठकीनंतर मूर्तीकार बाहेर पडले. या वेळी पीओपी मूर्तीविरोधात भूमिका घेणारे मूर्तीकार व संघटनेचे पदाधिकारी वसंत राजे यांच्यावर रस्त्यातच दोघांनी हल्ला केला. याप्रकरणी राजे यांनी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे निर्णयापेक्षा ही बैठक हाणामारीमुळे गाजली.
यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा, यासाठी पालिकेने तयारी केली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार यंदा मुंबईत पीओपीच्या मूर्तींना बंदी असणार आहे. मुंबई महापालिकेने शाडू मातीपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार कराव्यात, यासाठी मूर्तीकारांना आवाहन केले आहे. यासाठी पालिकेकडून मागणीनुसार मोफत माती दिली जाईल, असे आवाहन केले आहे. गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने शुक्रवारी परळ येथील पालिकेच्या एफ दक्षिण कार्यालयात मूर्तीकारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत केवळ मुंबईतील शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारणारे मूर्तिकार आणि पीओपी मूर्तीचे निर्माते यांना बोलावण्यात आले होते. ही बैठक सुरू होण्याआधीच शाडू मूर्तीकार व पीओपी मूर्तीचे निर्माते यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. हा वाद अधिकच चिघळला आणि एकमेकांसमोर माईक, खुर्च्या, बाटल्या फेकल्या. यात जोरदार बाचाबाची झाली. दोन्हीही एकमेकांसमोर भिडले. या वादातच बैठक पार पडली. बैठकीनंतर सर्व मूर्तिकारांचे प्रतिनिधी महापालिकेतून बाहेर पडले; मात्र पीओपी मूर्ती विरोधात भूमिका घेणारे वसंत राजे यांच्यावर रस्त्यात दोघांनी हल्ला केला. दरम्यान, अन्य काही मूर्तिकारांनीही आपल्याला मारहाण केली, असा आरोप राजे यांनी केला. या मारहाणीत राजे यांच्या डोक्याला, ओठाला, छातीला मार लागला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राजे यांनी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून केईएम रुग्णालयात त्यांनी वैद्यकीय चाचणीही केल्याचे त्यांनी सांगितले.
...
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा!
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार यंदाचा श्रीगणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यानुसार मूर्तिकारांना मंडपांसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर जागा आणि मूर्ती साकारण्यासाठी शाडू माती मोफत पुरवत आहे. या सुविधांचा वापर करून मुंबईतील मूर्तिकारांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्ती तयार करून यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन या बैठकीत उप आयुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी केले आहे. तसेच मूर्तिकारांना उद्भवत असलेल्या समस्या प्रशासकीय विभाग स्तरावर सोडविण्यात येतील, असेही सपकाळे यांनी सांगितले.