महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा MahaCPD प्लॅटफॉर्म – राज्यभरातील डॉक्टरांसाठी डिजिटल सीपीडीचे उपक्रम
GH News April 26, 2025 06:14 PM

मुंबई, एप्रिल 26: भारतात प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरांसाठी त्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी 30 सीपीडी (कंटिन्यूअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट) गुण पूर्ण करणे अनिवार्य असते, ही गरज लक्षात ठेवून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) यांनी MahaCPD हे ऑनलाइन सीपीडी प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व डॉक्टरांना त्यांची व्यावसायिक कार्यक्षमता, ज्ञान, तसेच परवानानूतनीकरणसाठी आवश्यक असणारे सीपीडी गुण अगदी सहजरीत्या पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

भारत सरकारच्या नियमानुसार प्रत्येक डॉक्टरांना पाच वर्षांच्या कालावधीत 30 सीपीडी गुण मिळविणे बंधनकारक आहे. त्यामधील 10 सीपीडी गुण ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्याची परवानगी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने MahaCPD प्लॅटफॉर्मद्वारे डॉक्टरांना दिली आहे. त्यामुळे डॉक्टरांना त्यांच्या व्यावसायिक कार्यक्षमतेत वाढ आणि वैद्यकीय परवाना नूतनीकरण या दोन्ही प्रक्रिया सुलभतेने पूर्ण करण्यासाठी डिजिटल सेवा उपलब्ध झाला आहे.

सीपीडी कार्यशाळा प्रामुख्याने शहरी भागात आयोजित केल्या जातात. त्यामुळे ग्रामीण व मागासलेल्या भागातील डॉक्टरांसाठी त्यात सहभागी होणे कठीण जाते. रुग्णसेवा आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळताना या कार्यशाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनेक डॉक्टरांसाठी कठीण होते आणि त्यामुळे अनेक डॉक्टरांना त्यांच्या परवाना नूतनीकरणासाठी आवश्यक असलेले सीपीडी गुण पूर्ण करणे शक्य होत नाही. याच पार्श्वभूमीवर MahaCPD प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून डॉक्टरांना त्यांच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार सीपीडी गुण पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे.

सध्याच्या गतिमान आरोग्यसेवेत डॉक्टरांसाठी नियमित अद्यावत प्रशिक्षण हीकाळाची गरज आहे, मात्र वेळेअभावी ते शक्य होत नाही. त्यामुळे डॉक्टरांना त्यांच्याव्यावसायिक जबाबदाऱ्या आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टी सांभाळून शिकण्याची संधी मिळते – जे केवळ ज्ञानवृद्धीसाठीच नव्हे, तर रुग्णसेवेतील गुणवत्तेसाठीही अत्यावश्यक आहे.

MahaCPD प्लॅटफॉर्म अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून त्यात फेशियल रीकग्निशन (Facial Recognition) व ब्लॉकचेन आधारित प्रमाणपत्र प्रणाली यांचा समावेश आहे. यामुळे डॉक्टरांची ओळख अचूकपणे पडताळता येते आणि त्यांना दिली जाणारी प्रमाणपत्रे सुरक्षित, बदल न होणारी आणि डिजिटल स्वरूपात मिळतात.

पुण्यातील जनरल फिजिशियन डॉ. जान्हवी म्हणतात, “बऱ्याचदा सीपीडी प्रोग्रॅम्सचेस्थळ हे इतके लांब असतात की कामाच्या धावपळीत तिथं जाणे शक्य होत नाही. शिवाय रुग्णसेवा व इतर व्यावसायिक जबाबदाऱ्या असतात त्यामुळे इच्छाअसतानाही वेळे अभावी सुट्टी घेणं शक्य होत नाही. त्यामुळे कित्येक वेळा नोंदणी करूनही कार्यक्रमास जाता येत नाही. MahaCPD मुळे मी आता सहजपणे ऑनलाइन कोर्स पूर्ण करू शकते आणि माझी परवाना नूतनीकरण प्रक्रिया वेळेत पूर्ण करू शकते.”

डिजिटल शिक्षण – ही सध्या काळाची गरज आहे अशा प्रकारची डिजिटल शैक्षणिक व्यवस्था इतर भारतातील राज्यांनाही प्रेरणा देणारी ठरू शकते. CPD सारख्या गरजेच्या उपक्रमांसाठी डिजिटल पर्याय उपलब्ध करून देणं ही एक दूरदृष्टी असलेली वाटचाल आहे, जी संपूर्ण देशभरातील आरोग्यसेवेच्या दर्जात सकारात्मक बदल घडवू शकते.

डॉक्टरांना MahaCPD मध्ये नोंदणी करण्यासाठी www.mahacpd.com या अधिकृत वेबसाइट जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.