राजीव तांबे - साहित्यिक, बालमानसविषयक तज्ज्ञ
अगदी दोन दिवसापूर्वीची ही गोष्ट. मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो आणि अचानक बाजूच्या घरातून पालकांचा आरडाओरडा ऐकू येऊ लागला. नंतर पालकांचा आवाज चढत्या क्रमानं चढत जाऊ लागला आणि नंतर अर्थातच मुलाचं किंचाळणं. ओह! याचा अर्थ हे युद्ध दोन पालकांतील नसून, ‘सुसंस्कारी’ पालक आणि ‘कुसंस्कारी’ मुलगा यातलं आहे! मी बेचैन झालो. मी मित्राला म्हणालो, ‘‘मी जाऊ का तुमच्या शेजाऱ्यांकडे? तो मुलगा अडचणीत आहे, असं वाटतंय. त्याच्या मदतीला आपण गेलं पाहिजे, नाहीतर ते सुसंस्कारी पालक एखादवेळेस त्या मुलाला मारतील, बडवतील.’’
‘‘अरे हे रोजचंच आहे. रोज दुपारी शाळेत जायच्यावेळी हेच नाटक चालू असतं. तो मुलगाच हट्टी आहे.’’
आता मित्राशी बोलण्यात काही अर्थ नाही हे कळल्यावर मी सरळ ‘त्या बाजूच्या’ घरात गेलो. घरातलं वातावरण तंग होतं. सुसंस्कारी पालकांनी हातात पट्टी घेतली होती. समोर इयत्ता पहिलीमधला मुलगा ताठ मानेनं उभा होता.
अचानक माझा प्रवेश होताच जरा गडबड झाली. माझ्याकडे आशेनं पाहत पालक म्हणाले, ‘‘बघा. बघा. रोज शाळेत जाताना हेच नाटक. मी त्याला समजावलं, आता शाळेत गेला नाहीस तर तुला मोठेपणी भीक मागावी लागेल. तर तो म्हणतो ‘ओके’. माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते आहे..’’
मी त्यांना म्हटलं, ‘‘मी जरा या मुलाशी बोलू का? त्याला का शाळेत जायचं नाही, हे जरा समजून घेतो.’’
हे ऐकताच मुलानं डोळे पुसले; पण ते पालक उसळून म्हणाले, ‘‘अहो तो दिवस-रात्र टीव्हीवर ‘छोटा भीम’ पाहत असतो. त्यानं हट्ट केला म्हणून त्याला एक गदाही आणून दिली. आई त्याला रोज लाडूही देते. सगळे हट्ट पुरवले तर आता हे नवीनच..’’
त्यांना कसंबसं थांबवत मुलाला जवळ घेतलं. तो मुलगा म्हणाला, ‘‘मला छोटा भीम व्हायचं आहे. छोटा भीम काही शाळेत जात नाही. म.. मी पण शाळेत जाणार नाही. मी छोटा भीम होऊन दुष्टांना गदा मारणार आणि लोकांना मदत करणार..’’
हे ऐकताच पालकांची सटकली. मी त्यांना आवरत म्हणालो, ‘‘मला फक्त पंधरा मिनिटं द्या. आणि कृपया इथे शांत बसा.’’
ते धुसफुसत खुर्चीत बसले. मी मुलाला विचारलं, ‘‘तू छोटा भीम होणार हे नक्की आहे का?’’ ‘‘हो काका. नक्की.’’ ‘‘मग ठीक आहे. आजपासून तू शाळेत जायचं नाही.’’
हे ऐकताच मुलाला अतीव आनंद झाला. मी मुलाला जवळ घेत म्हटलं, ‘‘आजपासून तू फक्त लाडू खायचे, कारण छोटा भीम लाडूच खातो.’’ त्यानं खुशीने मान डोलावली. ‘‘आज संध्याकाळी आम्ही सगळे भेळ खायला जाणार आहोत. नंतर गारेगार कुल्फी खाणार आहोत. पण तू मात्र लाडूच खा. तुला भेळ, कुल्फी मिळणार नाही कारण छोटा भीम ते खात नाही.’’
आता मुलगा गडबडला. पालक निवळू लागले. ‘‘आणि हो, आजपासून तू शर्ट पॅंट घालायची नाही. धोतर नेसायचं आणि उघडंच राहायचं. सकाळ झाली, की हात गदा घेऊन बाहेर पडायचं.’’
आता मुलाची चलबिचल वाढली. पालक खूश दिसू लागले. ‘‘आणि आम्ही भेळ, वडापाव, कुल्फी खात असताना, तू गदा घेऊन आमचं रक्षण करायचं; पण खायचे फक्त लाडूच..’’
या क्षणी स्फोट झाला! मुलगा म्हणाला, ‘‘मला नाही व्हायचं छोटा भीम. मी शाळेत जाणार; पण मला आज भेळ आणि कुल्फी पाहिजे.’’ ‘‘हरकत नाही. तू मोठेपणी होशील का छोटा भीम?’’ पुढे काय झालं असेल..? हे सांगायची गरज नाही.
लक्षात घ्या, मुलं हट्ट करतात तेव्हा त्यांचे हट्ट, त्यांचं म्हणणं काळजीपूर्वक ऐका. त्यांना भरपूर बोलू द्या. त्यांच्या बोलण्यातच त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं असतं. पालक हट्टीपणा करतात. मुलाचं संपूर्ण ऐकून न घेता एकच गोष्ट वारंवार सांगत राहतात. मग मुलाला कोपच्यात घेऊन उपदेश करतात आणि मग सारंच बिघडतं. चर्चेतून, गप्पातून मुलांच्या हट्टाची तीव्रता कमी करता येते.
‘हट्ट म्हणजे वेगळा विचार, हे ज्या पालकांना समजतं त्या घरातलं वातावरण निर्मळ असतं’ ही चिनी म्हण लक्षात ठेवा.