गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघ सध्या नवा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळत आहेत. रहाणे चांगल्या फॉर्ममध्ये असला, तरी संघाची कामगिरी मात्र फारशी चांगली झालेली नाही. त्यांना पहिल्या ८ सामन्यांपैकी तीन सामनेच जिंकता आले आहेत.
अशात आता त्यांच्या संघाला एक चांगली बातमी मिळाली आहे. आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारतीय गोलंदाज उमरान मलिक संघात दाखल झाला आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अद्यापही दुखापतीतून पूर्ण बरा झालेला नाही. तो संघात दाखल झालेला असला, तरी यंदाच्या हंगामात खेळणार नाही. कोलताताने सांगितले आहे की तो संघात दाखल झाल्यानंतरही त्याच्यावरील उपचार आणि पुनरागमनासाठीचे प्रोग्राम होत राहतील. तो उर्वरित हंगामात संघासोबतच असणार आहे.
याशिवाय कोलकाताने असेही स्पष्ट केले की उमरानला अधिकृत संघात स्थान देण्यात आलेले नाही. पण तो सपोर्ट स्टाफ आणि संघासोबत असणार आहे आणि त्याच्या क्रिकेटवर काम करत राहिल.
उमरान मलिक आयपीएल २०२५ स्पर्धेच्या आधी मार्चमध्ये दुखापत (Hip Injury) झाली होती. त्यामुळे तो या संपूर्ण हंगामातून बाहेर झाला होता. त्याच्या जागेवर कोलकाताने चेतन साकारियाला संघात बदली खेळाडू म्हणून घेतले आहे.
उमरान मलिकने २०२१ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने आयपीएलमध्ये सर्वात जदल ताशी १५७ किमी वेगाने चेंडू टाकला आहे. मात्र त्याला सातत्याने दुखापतींनीही घरल्याचे दिसून आले, तो २०२२ चा आयपीएल हंगाम वगळता एकही पूर्ण हंगाम खेळू शकलेला नाही. त्याने २०२२ मध्ये १४ सामन्यांत २२ विकेट्स घेतल्या होत्या.
त्याने याआधी चारही हंगाम तो सनरायझर्स हैदराबादकडून खेळला होता. पण त्याला आयपीएल २०२५ पूर्वी सनरायझर्स हैदराबादने करारमुक्त केले. त्यानंतर आयपीएल २०२५ मध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्सने ७५ लाखांच्या किंमतीत संघात घेतले. पण खेळण्यापूर्वीच तो दुखापतग्रस्त झाला होता. उमरानने भारताकडून १० वनडे आणि ८ टी२० सामनेही खेळले आहेत.