पाकिस्तान हॉकी संघ सध्या फार काही चांगली कामगिरी करत नाहीये. त्यातच आता पाकिस्तान हॉकी फेडरेशन मोठ्या संकटात सापडले आहेत. मलेशिया हॉकी फेडरेशनकडून त्यांची कोंडी करण्यात आली आहे.
आगामी सुलतान अझलान शाह कप २०२५ स्पर्धेसाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही. त्यांचे आमंत्रण स्थगित करण्यात आले आहे. ही स्पर्धा यावर्षीच्या अखेरीस २२ ते २९ नोव्हेंबर दरम्यान मलेशियातील इफोह येथे खेळवली जाणार आहे.
पाकिस्तानला आमंत्रित न करण्यामागे थकबाकी कारण आहे. जोहर असोसिएशना १०, ३४९ अमेरिकन डॉलर पाकिस्तानला द्यावे लागणार आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये जोहर हॉकी कप झाला होता.
यावेळी दौऱ्यादरम्यान पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या निवास, प्रवास आणि अतिरिक्त खर्चाचे पैसे जोहर हॉकी फेडरेशनला पाकिस्तानकडून अद्याप मिळाले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार सुत्राने माहिती दिली आहे की 'संघाच्या रहाण्याची आणि इतर खर्चाची जबाबदारी आयोजकांनी घेतली होती. पण पाकिस्तान हॉकी फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना आणि माजी अध्यक्षांना स्पष्टपणे सांगण्यात आले होते की त्यांचा खर्च त्यांनाच करावा लागेल. अधिकारी त्यावेळी संघ थांबलेल्याच महागड्या हॉटेलमध्ये थांबले होते.'
याबाबात जोहर असोसिएशनने मलेशियन हॉकी फेडरेशनकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांनी अधिकी चेतावणी दिली आहे की जर पैसे दिले नाही, तर ते आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडेही तक्रार करतील.
सुत्राने सांगितले की 'आता पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे सध्याचे अध्यक्ष आणि त्यांची टीम कोंडीत सापडले आहेत. कारण आधीच फेडरेशन आर्थिक संकटात आहे आणि त्यांना माजी अधिकांऱ्यांनी केलेल्या या खर्चाची माहिती नव्हती.'
आगामी सुलतान अझलान शाह कप २०२५ स्पर्धेत मलेशियाशिवाय भारत, जर्मनी, बेल्जियम, कॅनडा आणि आयर्लंड संघ सहभागी होणार आहेत. आता पाकिस्तानच्या सहभागावर प्रश्नचिन्ह आहे. ही स्पर्धा सर्वाधिकवेळा भारताने जिंकली आहे. भारताने ५ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.