सोलापूर: सोलापुरातील प्रख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा मानेच्या जामीनासाठी सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. आरोपी मनीषा माने हिने वकील प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. आज हा अर्ज न्यायालयसमोर येईल आणि त्यानंतर त्यावर सरकारी पक्षाचे म्हणणे मागवले जाईल. सरकारी पक्षाचे म्हणणे आल्यानंतरच या जामीन अर्जावर सुनावणी होईल. आरोपी मनीषा माने सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांनी आरोपीकडून हवा असलेला तपास आणि चौकशी केली आहे. त्यामुळे अधिक न्यायालयीन कोठडीची आवश्यकता नसून आरोपीला जामीन मंजूर करण्याची आरोपीच्या वकिलांची मागणी आहे. त्यामुळे बहुचर्चित असलेल्या या प्रकरणातील महिला आरोपी मनीषा माने यांना जामीन मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे, अशातच मनीषाने पाठवलेल्या एका मेलमुळे डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या करतील असे दिसून येत नाही, तिची व्यथा तिने मेलमध्ये मांडल्याचं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं आहे.
प्रख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर मनीषाने पाठवलेल्या त्या एका मेलमुळे ते आत्महत्या करतील असे दिसून येत नाही. ‘त्या’ मेलमध्ये तिने तिची व्यथा मांडली आहे. या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे असं म्हणत सोमवारी यासह अनेक मुद्यांवर आपण मनीषा मानेच्या जामिनासाठी अर्ज करणार असल्याची भूमिका आरोपीच्या वकिलांनी स्पष्ट केली आहे. डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा पोलिस कोठडीनंतर सध्या 9 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. मनीषाला यापूर्वी पाच दिवस पोलिस कोठडी सुनावलेली आहे, त्यामुळे तिच्यापुरता प्राथमिक तपास संपलेला असल्याचे दिसून येते. तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही. दोन मुलांची जबाबदारी तिच्यावरती आहे. यापूर्वी पोलिस तपासात सहकार्य केले होते. भविष्यातही ती सहकार्य करेल, असंही आरोपी मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी स्पष्ट केलं आहे.
वळसंगकरांच्या आत्महत्या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे. एका महिलेस खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आले आहे. सदर हॉस्पिटलमध्ये सन 2008 पासून सेवा बजावत आली आहे. गुन्हा दाखल होईपर्यंत फिर्यादी अथवा कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून कोणतेही आरोप केले गेले नव्हते. आरोपांप्रमाणे मनीषा त्रासदायक होती तर तिला जबाबदारी दिली नसती. तिला त्याच वेळी नोकरीवरून कमी केले असते अथवा तिच्याविरुद्ध तक्रारी झाल्या असत्या, असेही आरोपींच्या वकिलांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..