आयपीएल 2025 स्पर्धेच्या 47व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा 8 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 209 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने 15.5 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला तो 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी.. राजस्थान रॉयल्सने या विजयासह प्लेऑफच्या आशा अजूनही जिवंत ठेवल्या आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सचं स्थान मात्र डळमळीत झालं आहे. खरं तर साखळी फेरीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेतील चित्र बदलताना दिसत आहे. कोणत्याही संघाला टॉप 2 मध्ये राहायला आवडेल. कारण टॉप दोन संघ प्लेऑफमधील पहीला सामना जिंकताच अंतिम फेरी गाठणार आहे. तर पराभूत संघाला आणखी संधी मिळेल. त्यामुळे प्लेऑफमध्ये स्थान मिळवताना टॉप 2 मध्ये राहण्याचा प्रयत्न असेल.
गुजरात टायटन्स हा संघ राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी टॉप 2 मध्ये होता. मात्र राजस्थानने पराभवाची धूळ चारताच नेट रनरेटला धक्का बसला आहे. त्यामुळे दुसऱ्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर मुंबई इंडियन्सला फायदा झाला आहे. मुंबई इंडियन्स संघ तिसऱ्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, विजयाची चव चाखत आलेल्या गुजरात टायटन्स संघाचं अजून प्लेऑफमधील स्थान पक्कं नाही. त्यामुळे उर्वरित पाच सामन्यापैकी दोन सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. तर टॉप 2 मध्ये राहण्यासाठी पाच पैकी पाच सामन्यात जिंकणं आवश्यक आहे.
गुजरात टायटन्सचा पुढचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आहे. हा सामना 2 मे रोजी होणार आहे. त्यानंतर 6 मे रोजी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. 11 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सशी सामना होईल. 14 मे रोजी गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात लढत होईल. तर 18 मे रोजी साखळी फेरीतील शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. त्यामुळे या पाच सामन्यापैकी दोन सामने काहीही करून जिंकावेच लागणार आहे. अन्यथा प्लेऑफचं गणित चुकेल. टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्यासाठी पाच किंवा चार सामने जिंकावे लागतील.