Khawaja Asif : दहशतवाद्यांना तीस वर्षांपासून पाठबळ; पाकच्या संरक्षणमंत्र्यांची कबुली, मुलाखतीत पडले पितळ उघडे
esakal April 26, 2025 08:45 AM

लंडन - पहलगाम हल्ल्यात आमचा हात नसल्याचा दावा पाकिस्तान सरकार करत असले तरी या देशाच्या संरक्षणमंत्र्यांनीच दिलेल्या कबुलीमुळे पाकिस्तानचे पितळ उघडे पडले. तीस वर्षांपासून पाश्चिमात्य देशांच्या सांगण्यावरून दहशतवादी संघटनांना पाठबळ, प्रशिक्षण आणि पैसा देण्याचे घाणेरडे काम करत आहोत, असे या देशाचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले. या चुकीचा पाकिस्तानला प्रचंड फटका बसल्याचेही त्यांनी मान्य केले.

ख्वाजा असिफ यांनी ‘स्काय न्यूज’ या वाहिनीला दिलेली मुलाखत गुरुवारी रात्री प्रसारित करण्यात आली. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली असून भारतानेही कठोर राजनैतिक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

हल्लेखोरांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत जात असल्याचा भारताचा आरोप असला तरी पाकिस्तानने तो फेटाळला आहे. या पार्श्वभूमीवर असिफ यांची ही मुलाखत प्रसारित झाली असल्याने पाकिस्तान तोंडघशी पडला आहे.

पाकिस्तान दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण आणि पैसा पुरवत असल्याचे तुम्ही मान्य करता का, असा प्रश्न वृत्तनिवेदिका याल्दा हकीम यांनी असिफ यांना विचारल्यावर असिफ म्हणाले,‘‘आम्ही अमेरिका आणि ब्रिटनसारख्या पाश्चिमात्य देशांसाठी तीस वर्षांपासून हे घाणेरडे काम करत आहोत.

ही फार मोठी चूक असून त्याचे परिणाम भोगले आहेत. आम्ही आधी सोव्हिएत महासंघाविरोधात आणि नंतर ९/११ च्या हल्ल्यानंतर झालेल्या युद्धात सहभाग घेतला नसता तर, आमचा इतिहास तसा चांगला होता.

आम्ही जेव्हा त्यांच्या बाजूने सोव्हिएतविरोधात लढलो होतो, तेव्हा आता ज्यांना तुम्ही दहशतवादी म्हणता, ते जिंकत होते आणि अमेरिकेत मेजवान्या झोडत होते. अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यानंतरही अशीच स्थिती निर्माण झाली होती. आमच्या सरकारने दरवेळी चूक केली. दरवेळी आमचा प्यादे म्हणून वापर केला गेला.’

‘लष्करे’ अस्तित्वात नाही’

निवेदिकेने पहलगाम हल्ल्याबाबत आणि या हल्ल्याची जबाबदारी घेतलेल्या रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेबाबत विचारले असता असिफ यांनी या संघटनेचेच नाही, तर तिची पालक संघटना असलेल्या लष्करे तैयबाचेच पाकिस्तानमध्ये अस्तित्व नसल्याचा दावा केला.

पहलगाम हल्ल्यामुळे संघर्ष होण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता असिफ यांनी योग्य ते प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे सांगितले. ‘भारत जी काही कृती करेल, त्याला त्याच प्रमाणात प्रत्युत्तर दिले जाईल. आमच्यावर युद्ध लादले तर आम्हीही युद्ध करू,’ असे असिफ म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.