Pandharpur Temple : पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोबाईल, कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी; का घेतला मंदिर समितीने असा निर्णय?
esakal April 26, 2025 11:45 AM

पंढरपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या (Pahalgam Terror Attack) पार्श्वभूमीवर श्री मंदिराच्या (Vitthal Rukmini Temple) सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

मंदिर समितीच्या निर्णयानुसार व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या सूचनेनुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मंदिरात मोबाईल (Mobile) व कॅमेरासदृश वस्तूंना प्रवेश बंदीची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र परिधान करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

कर्मचाऱ्यांना मंदिरात प्रवेश करणे व बाहेर पडण्यासाठी फक्त व्हीआयपी गेटचा वापर करण्यात येत आहे. मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी असून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर समितीमार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचेही यावेळी श्रोत्री यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.