नवी दिल्ली : ‘‘स्वातंत्र्य सैनिकांविरोधात बेजबाबदार विधाने करू नका, अन्यथा भविष्यात अशा विधानांची आम्ही स्वत:हून दखल घेऊ,’’ अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना फटकारले.
‘‘यावेळी सावरकर आहेत. पुढील वेळी कोणीतरी महात्मा गांधी यांना इंग्रजांचे नोकर म्हणून संबोधल’’, अशी टिप्पणी न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश मनमोहन यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान केली. दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अवमानना केल्याप्रकरणी लखनौ येथील न्यायालयाने गांधी यांना बजावलेल्या समन्सला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
‘‘स्वातंत्र्यसैनिकांविरोधातील विधानांना परवानगी दिली जाणार नाही. राहुल गांधी यांनी व्यवहार नीट न ठेवल्यास ते अडचणीत येतील,’’ अशा शब्दांत न्यायाधीश दत्ता यांनी गांधी यांना सुनावले. त्याचवेळी न्यायालयाने महात्मा गांधी यांच्या पत्राचाही न्यायालयाने यावेळी उल्लेख केला.
‘‘राहुल गांधी यांना इतिहास आणि भूगोल माहिती असता तर ते असे वागले नसते. इंदिरा गांधी यांनी सावरकरांची प्रशंसा करणारे पत्र पाठवले होते, हे त्यांना माहीत नाही का? एका राजकीय पक्षाचे नेते असूनही ते अशा प्रकारची विधाने का करतात? असा मुद्दा न्या. दत्ता यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रात सावरकरांची पूजा‘‘महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांची पूजा केली जाते आणि त्याठिकाणी जाऊन तुम्ही त्यांच्याविरोधात वादग्रस्त विधाने करता...’’ अशा शब्दात खंडपीठाने गांधी यांना खडसावले. राहुल गांधी यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान अकोला येथे सावरकरांना उद्देशून वादग्रस्त विधान केले होते.
सावरकरांविरोधात केलेल्या विधानाच्या अनुषंगाने लखनौ येथील न्यायालयाने गांधी यांच्याविरोधात समन्स बजावले होते. हे समन्स रद्द करण्याची गांधी यांची विनंती याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.