या 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला. निरपराध पर्यटकांना धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. देशभरातील 26 पर्यटकांचा यामध्ये जीव गेला. तर जे स्थानिक मदतीसाठी धावले, त्यांनाही जीव गमवावा लागला. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयब्बाचा एक गट टीआरएफने (TRF) स्वीकारली होती. पण पाकिस्तान जितका खोटारडा आहे, तितक्याच त्याने पोसलेल्या दहशतवादी संघटना सुद्धा खोटरड्या आणि नापाक आहे हे वेळोवेळी उघड झाले आहे. धर्माच्या नावावर निरपराध हत्या करणाऱ्या या संघटनांचा नवा कांगावा समोर आला आहे.
टीआरएफचा नवीन दावा काय?
द रेसिस्टन्स फोर्स -टीआरएफने पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबादारी स्वीकारली होती. या हल्ल्यात सहा दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. यामधील दोन दहशतवादी स्थानिक तर चार दहशतवादी हे पाकिस्तानातील असल्याचे समोर आले होते. या दहशतवाद्यांचे रावळपिंडी आणि रावळकोट कनेक्शन आता उघड झाले आहे. तर काही निवृत्त लष्करी अधिकार्यांच्या दाव्यानुसार दहशतवाद्यांमध्ये दोन जण हे पाकिस्तानी लष्करातील कमांडो असल्याचे म्हटले होते.
आता टीआरएफने हा हल्ला आपण केला नसल्याचा कांगावा आता सुरू केला आहे. यापूर्वी टीआरएफने आपणच हा हल्ला घडवून आणल्याचा दावा केला होता. पण भारताने धडक कारवाई सुरू केल्याने आणि भारत पाक व्याप्त काश्मीरवर हल्ला करण्याची शक्यता लक्षात घेता टीआरएफने या हल्ल्यातून हात मागे घेतल्याचा दावा करण्यात येत आहे.
TRF चा कांगावा
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या टीआरएफ या संघटनेने घुमजाव केले. हा हल्ला आपण केला नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. पाकिस्तानचे दोन दिवसानंतर स्वर नरमले आहेत. याप्रकरणी चौकशीसाठी तयार असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तर त्याचवेळी टीआरएफने या हल्ल्यात आपला हात नसल्याचे म्हटले आहे. हा निश्चितच योगायोग नाही. पाकिस्तान सरकारने संघटनेवर दबाव टाकल्याचे बोलले जात आहे.
आपले सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात आले होते. आणि त्यावरून संघटनेने हा हल्ला केल्याचा दावा करण्यात आल्याचा कांगावा टीआरएफने आता केला आहे. पण पाकिस्तान आणि त्याने पोसलेल्या संघटना या खोटारड्या आहेत, याचा अनुभव गेल्या 70 वर्षात कायम आला आहे.