पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचं पाणी तोडून त्यांच्या आर्थिक नाड्याही आवळल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानची चडफड झाली आहे. पाकिस्तानने भारतालाही धमक्या द्यायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही हवेत गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे भारताला मोठ्या मोठ्या धमक्या देणारा पाकिस्तान आज त्यांच्याच देशातील अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याने हादरून गेला आहे. बलूचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाला आहे. बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) क्वेटा येथील मार्गट परिसरात पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला आहे. यात पाकिस्तानचे 10 सैनिक ठार झाले आहेत. बीएलएच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला रिमोट कंट्रोल्ड इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस म्हणजे आयईडीने करण्यात आला आहे. यात पाकिस्तानी सैन्याच्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे.
क्वेटा परिसर गेल्या काही वर्षापासून बलूच बंडखोरांच्या कारवायांचं केंद्र राहिला आहे. बीएलएने केलेल्या हल्ल्याबाबत पाकिस्तानने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, या हल्ल्यात 10 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून त्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाल्याचं वृत्त आहे. बलूच लिबरेशन आर्मी गेल्या अनेक वर्षापासून बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. त्यासाठी या फोर्सकडून शस्त्र उठाव केला जात आहे.
पाकिस्तानात गेल्या काही काळापासून सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. गेल्या महिन्यात क्वेटाहून ताफ्तान जात असलेल्या सैन्याच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात सात सैनिकांचा मृत्यू झाला होता. 21 जखमी झाले होते. या हल्ल्याची बलूच लिबरेशन आर्मीने जबाबदारी घेतली होती. तसेच या हल्ल्यात 90 पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावाही केला होता.
या पूर्वी 11 मार्च रोजी क्वेटाहून पेशावरला जात असलेली जाफर एक्सप्रेस बीएलएच्या बंडखोरांनी हायजॅक केली होती. या ट्रेनला दुपारी 1.30 वाजता सिब्बीला पोहोचायचं होतं. पण बोलानच्या माशफाक टनलजवळ हल्ला करण्यात आला. बीएलएने ट्रेन हायजॅक करण्याची पूर्ण तयारी केली होती. बीएलएचे बंडखोर ट्रेनची वाटच पाहत होते. ट्रेन येताच त्यांनी हल्ला चढवला होता.
बलूच लिबरेशन आर्मीची स्थापना 1970 च्या दशकात झाली होती. काही काळ ही संघटना निष्क्रिय होती. 2000 मध्ये पुन्हा एकदा ही संघटना नव्याने उभी राहिली. भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर आम्हालाही स्वतंत्र देश म्हणून राहायचं होतं, असं बलूचिस्तानमधील लोकांचं म्हणणं आहे. पण आमचं न ऐकता आम्हाला पाकिस्तानमध्ये ढकलण्यात आलं, असं या लोकांचं म्हणणं आहे.
बलूच लिबरेशन आर्मीला स्वतंत्र बलूचिस्तान हवंय. एका अंदाजनुसार बीएलएकडे सहा हजार तरुणांची फौज आहे. मजीद ब्रिगेड हा या संघटनेचं आत्मघाती पथक आहे. या पथकात 100 हून अधिक सुसाईड अटॅकर आहेत. यात महिलांची संख्या अधिक असल्याचं सांगितलं जातं.