‘तुम्ही पाणी थांबवले तर…’ पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला थेट धमकी
GH News April 26, 2025 03:07 PM

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या विरोधात कारवाई केली आहे. भारताने सिंधु पाणी करार संपवला आहे. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांपासून विरोधी नेत्यांपर्यंत भारताला धमकवले जात आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे पाणी कमी केले किंवा थांबवले तर पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाणार असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटले की, आम्ही कोणत्याही प्रकारच्या धाडसाला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. याबद्दल कोणीही चूक करू नये. पाकिस्तान २४ कोटी लोकांचा देश आहे. आम्ही आमच्या शूर सशस्त्र दलांच्या मागे नेहमी उभे राहणार आहे. हा संदेश स्पष्ट आहे. शांतता आमची प्राथमिकता आहे. परंतु आम्ही आमच्या अखंडतेशी आणि सुरक्षिततेशी कधीही तडजोड करणार नाही.

बिलावल भुट्टो बडबडला…

पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे अध्यक्ष असलेले बिलावल भुट्टो यांनीही भारताला धमकी दिली आहे. सखर येथे सिंधु नदीच्या किनाऱ्यावर घेतलेल्या सभेत बिलावल भुट्टो म्हणाले, मी सिंधु खोऱ्याच्या जवळ उभा राहून सांगतो. सिंधु नदी आमची आहे. आमचीच राहणार आहे. या नदीतून आमचे पाणी वाहील किंवा त्यांचे रक्त वाहील. संपूर्ण सिंधु खोरे आमचे आहे, आमचेच राहणार आहे.

बिलावल भुट्टो भारताला रक्तपाताची धमकी देऊन थांबले नाही. त्यांनी आमचे सैन्य हल्ला करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. भारत सिंधु नदीतील पाणी कोणाचे आहे, त्याचा निर्णय घेऊ शकत नाही. अन्यथा पाकिस्तानी जनता आणि सैन्य उत्तर देण्यास तयार असल्याचे भुट्टो यांनी म्हटले आहे.

पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने कठोर पावले उचलत पाच निर्णय घेतले. त्यात सिंधु पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९६० मध्ये हा करार झाल्यानंतर प्रथमच रद्द करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तान चांगलाच संतापला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.