जत : जत तालुक्यातील एका आश्रमशाळेत (Ashram School) सातवी, आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या चार ते पाच अल्पवयीन मुलींवर मुख्याध्यापकाकडूनच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी (ता. २४) ही घटना उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी दिवसभर समाजकल्याण व महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित संस्थेची चौकशी केली.
याप्रकरणी संस्थेकडून तत्काळ त्या मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, तसा प्रस्ताव समाजकल्याण विभागास (Department of Social Welfare) पाठविण्यात आला आहे. यापूर्वी ही त्या मुख्याध्यपकाने असाच प्रकार केल्याचे समोर आले होते. मात्र, त्यावर कारवाई झालेली नव्हती. असा आरोप ही काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
ही घटना समजताच आमदार (Gopichand Padalkar) यांनी या आश्रमशाळेस भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना ‘त्या’ मुख्याध्यापकावर कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. समाजकल्याणच्या अधिकारी धनश्री शंकरदास व उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा महिला बालविकास अधिकारी संदीप यादव हे आज सकाळपासूनच या आश्रमशाळेत दाखल झाले. संबंधित मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांची कसून चौकशी केली. शाळेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शिवाय, गावातही तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते. या पार्श्वभूमीवर तासगावचे पोलिस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांनी शाळेस भेट देत घटनेची चौकशी केली आहे. रात्री उशिरापर्यंत समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून उमदी पोलिस ठाण्यात संबंधित मुख्याध्यपाकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने पुन्हा जत तालुक्यासह सांगली जिल्हा हादरून गेला आहे.
दरम्यान, हा प्रकार समजताच आमदार गोपीचंद पडळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. संबंधित समाजकल्याण व महिला बालविकास अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्या मुख्याध्यपकावर कठोर शिक्षा व्हावी, यामध्ये कोणाला ही पाठीशी घालू नका. पीडित मुलींच्या कुटुंबाला न्याय द्या, अशा सक्त सूचना दिल्या.
आमच्या संस्थेमध्ये ज्या पद्धतीने प्रकार घडला आहे, तो अतिशय निंदनीय असून, संस्था दोषींना पाठीशी घालणार नाही. याप्रकरणी संबंधित मुख्याध्यापकास तत्काळ निलंबित केले असून, समाजकल्याण विभागाकडे तसा प्रस्ताव ही पाठविण्यात आला आहे. चौकशीसाठी प्रशासनास जी मदत लागेल त्यात सर्व सहकार्य करू.
- डॉ. कैलास सनमडीकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष