कोलकाता : कोलकाता नाइट रायडर्स-पंजाब किंग्स यांच्यामध्ये आज आयपीएल साखळी फेरीचा सामना रंगणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाबचा संघ सहाव्या विजयासाठी प्रयत्न करील. गतविजेत्या कोलकाता संघाला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित लढतींमध्ये विजय आवश्यक आहे. श्रेयस अय्यर व अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाचाही या लढतीत कस लागणार आहे.
कोलकाता संघाने यंदाच्या मोसमात आठ सामन्यांमध्ये फक्त तीनच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पाच सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलकाता संघातील सलामी फलंदाजांकडून मोठी कामगिरी झालेली नाही. रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग यांच्याकडून मधल्या फळीत निराशा झाली आहे.
व्यंकटेश अय्यरही अधूनमधून चमक दाखवत आहे. अजिंक्य रहाणे व अंगक्रीश रघुवंशी यांच्याकडून आश्वासक कामगिरी झालेली आहे; मात्र इतर फलंदाजांकडून पुढाकार घ्यायला हवा. रोवमन पॉवेल याला संघात संधी द्यावी लागली आहे. त्याच्याकडूनही आशा बाळगल्या जात आहेत.
कोलकाता संघाची जमेची बाजू म्हणजे फिरकी गोलंदाजी. वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण व मोईन अली या फिरकी गोलंदाजांवर त्यांची मदार आहे. कोलकाता येथील इडन गार्डनची खेळपट्टी मनाजोगती बनवण्यात आली नाही, यामुळे क्युरेटर सुजन मुखर्जी यांच्यावर टीकाही करण्यात आली. आतापर्यंतच्या लढतींमध्ये वरुण, सुनील व मोईन या तीनही गोलंदाजांना ठसा उमटवता आलेला नाही. हर्षित राणा व वैभव अरोरा या वेगवान गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे.
भारतीय फलंदाज फॉर्ममध्येपंजाब संघातील भारतीय फलंदाज शानदार फलंदाजी करीत आहेत. श्रेयस अय्यर (२६३ धावा), प्रियांश आर्या (२५४ धावा), प्रभसिमरन सिंग (२०९ धावा), नेहल वधेरा (१८९ धावा), शशांक सिंग (१५८ धावा) या फलंदाजांकडून निर्णायक क्षणी चमकदार खेळ झालेला आहे. जॉश इंग्लिस, मार्कस स्टॉयनिस व ग्लेन मॅक्सवेल या परदेशी फलंदाजांना अपयश आलेले आहे.
अर्शदीप, युझवेंद्रचा गोलंदाजीत ठसापंजाब संघातील गोलंदाज प्रभावी कामगिरी करीत आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने ११ फलंदाज बाद केले असून फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल याने नऊ फलंदाज बाद केले आहेत. मार्को यान्सेन यानेही आठ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. हरप्रीत ब्रार, झेवियर बार्टलेट व यश ठाकूर यांच्याकडून गोलंदाजीत दमदार कामगिरी झालेली नाही. या तीनही गोलंदाजांकडून सुधारणेची गरज आहे.