अमोल कलये, रत्नागिरी प्रतिनिधी
Vasishthi river accident : रत्नागिरीमधील वाशिष्ठी नदीत दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. आई, मुलगा आणि आत्या या तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलाला बुडताना पाहिलं अन् आईने वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. दोघेही बुडत असल्याचे पाहून आत्यानेही पाण्यात उडी घेतली. पण दुर्दैवी तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. चिपळूण तालुक्यातील खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात ही घटना घडली.
लता शशिकांत कदम (३५), लक्ष्मण शशिकांत कदम (८), रेणुका धोंडीराम शिंदे (४५) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत. कपडे धुण्यासाठी गेले असता ही घटना घडली आहे. मुलगा लक्ष्मण पाण्यात बुडू लागल्याने आई लताने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली होती. मात्र दोघेही बुडू लागल्याने माय लेकरांना वाचवण्यासाठी मुलाची आत्या रेणुकाने पाण्यात उडी घेतली. मात्र तिघांचाही बुडून मृत्यू झाला. तिघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता आणि रेणुका कपडे धुण्यासाठी वाशिष्ठी नदीच्या काठावर गेल्या होत्या. त्यांच्यासोबत लक्ष्मणही होता. आई-आत्या कपडे धूत होत्या, त्यावेळी लक्ष्मण खेळता-खेळता पाण्यात गेला आणि तो बुडू लागला. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी लताने तातडीने पाण्यात उडी घेतली. मात्र, खोल पाण्यामुळे तीही बुडू लागली. माय-लेकरांची धडपड पाहून रेणुकाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तिनेही पाण्यात उडी घेतली. दुर्दैवाने, तिघेही पाण्याच्या खोलीत अडकले आणि बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.