आयपीएल 2025 स्पर्धेत सुरुवातीला ऋतुराज गायकवाड आणि नंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सची निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. आतापर्यंत खेळलेल्या नऊ पैकी सात सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स संघ एकदम तळाशी असून प्लेऑफच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. एखादा मोठा चमत्कार घडला तरच काय ते शक्य होईल. प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर चेन्नई सुपर किंग्सला सर्व सामने जिंकण्याबरोबरच इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. पण सध्याचं गणित पाहता चेन्नई सुपर किंग्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे उर्वरित पाच सामने हे नाममात्र असणार आहेत. चेन्नईने या पर्वाची सुरुवात मुंबई इंडियन्सविरुद्ध घरच्या मैदानावर विजयाने केली होती.पण त्यानंतर गेल्या आठ सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या घरच्या मैदानावरील सामन्यात झालेल्या पराभवानंतर बोलताना चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सलग पराभवामागील खरे कारण उघड केले.
चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मान्य केले की फ्रँचायझीने मेगा लिलावात मोठी चूक केल्याचं मान्य केलं. या हंगामाच्या सुरुवातीला संघाने काही गोष्टी योग्य केल्या नाहीत. तेव्हापासून, प्रत्येक सामन्यात घसरण सुरूच राहिली. “मेगा लिलावादरम्यान, आम्ही चांगले खेळाडू खरेदी करण्यात अपयशी ठरलो. आमच्या संघाच्या पराभवाचे हेच मुख्य कारण आहे. आम्ही फक्त अनुभवी आणि अनुभवी खेळाडूंवर विश्वास ठेवला, तर आम्हाला संघात नवीन खेळाडूंचाही समावेश करायला हवा होता.”
स्टीफन फ्लेमिंगने सध्याच्या स्थिती जबाबदारी स्वत: घेतली आणि खेळाडूंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. स्टीफनने सांगितलं की, ‘या पर्वाच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्सचा संघ चांगला होता. परंतु त्यांना कोणत्याही सामन्यात गेम प्लॅन लागू करता आला नाही. योजना योग्यरित्या अंमलात आणण्यासाठी खूप कट आणि बदल करण्यात आले, ज्यामुळे हा हंगाम वाया गेला.’
‘आमच्या संघातील खेळाडूंना झालेल्या दुखापती, खेळाडूंच्या फॉर्मचा अभाव यामुळे आम्हाला योजना योग्य रितीने राबवता आल्या नाहीत. आम्ही संघात बरेच बदल केले. आमची योजना नीट काम करत नव्हती आणि आम्ही हरलो. खूप जबाबदाऱ्या आहेत आणि त्याची सुरुवात नक्कीच माझ्यापासून वरच्या पदावरून होते.’, असंही फ्लेमिंगने पुढे सांगितलं.