आयपीएल 2025 सर्वात आक्रमक खेळाडूंचा भरणा असलेला संघ सनरायझर्स हैदराबाद आहे. पण असं असूनही सनरायझर्स हैदराबादची स्पर्धेतील कामगिरी सुमार राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या नऊ सामन्यापैकी फक्त 3 सामन्यात विजय मिळवता आला आहे. यासह ऑरेंज आर्मीच्या पारड्यात 6 गुण जमा झाले असून गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. मागच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला. चेन्नई सुपर किंग्सने 19.5 षटकात 154 धावा केल्या आणि विजयासाठी 155 धावांचं आव्हान दिलं. सनरायझर्स हैदराबादने 18.4 षटकात 5 गडी गमवून हे आव्हान गाठलं. या विजयानंतर सनरायझर्स हैदराबादचं प्लेऑफच्या आशा काही अंशी टिकून आहेत. सनरायझर्स हैदाराबादचा अष्टपैलू खेळाडूने संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल असं भाकीत केलं आहे. यासाठी त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं उदाहरण दिलं आहे.
सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू नितीश रेड्डीने मागच्या पर्वाचं उदाहरण देताना सांगितलं की, ‘मागच्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शेवटचे सर्व सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं. आम्हीही तसाच कारनामा करू शकतो.’ मागच्या पर्वात आरसीबीने सलग सहा सामन्यात विजय मिळवून प्लेऑफमध्ये जागा पक्की केली होती. नितीश रेड्डीने सांगितलं की, ‘टीममधील प्रत्येक खेळाडू सामना जिंकण्यासाठी 100 टक्के योगदान देईल.’ नितीश कुमारने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा विजय खूपच महत्त्वाचा होता हे देखील सांगितलं.
नितीश कुमार रेड्डीने कामिंदु मेंडिससोबत केलेल्या भागीदारीबाबत सांगितलं की, ‘आ्म्ही दोघं मोठे शॉट्स खेळण्याऐवजी एकेरी-दुहेरी धावांवर लक्ष केंद्रीत केलं. मोठी बाउंड्री लाइन असल्याने दोन-दोन धावा घेणं सोपं झालं होतं. त्यामुळे आम्ही आरामात लक्ष्य गाठू शकलो.’ सनरायझर्स हैदराबादचा पुढचा सामना 2 मे रोजी गुजरात जायंट्सशी, 5 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सशी, 10 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सशी, 13 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी आणि 18 मे रोजी लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे. खरं तर हे पाचही संघ गुणतालिकेत टॉपला असून प्लेऑफच्या शर्यतीत आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ या संघांचं गणित बिघडवू शकतो.