फुलवडे, ता. २६ : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील बोरघर, म्हाळुंगे, भोईरवाडी, कोंढरे, पंचाळे खुर्द व बुद्रुक, अडिवरे, असाणे, शेंद्रेवाडी आदी गावांमधील ३९
शेतकऱ्यांनी बायोगॅसला पसंती दिली आहे. त्यामुळे सरपणाचे प्रमाण कमी होऊन धुरापासून होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे संवर्धनही होणार आहे.
जुन्नर येथील शाश्वत ट्रस्ट यांच्या माध्यमातून राष्ट्रीय बायोगॅस योजनेतून तसेच टाटा मोटर्स यांच्या सीएसआर निधीतून बायोगॅस प्रकल्प तयार करून भेट दिल्याची माहिती शाश्वत ट्रस्टचे अध्यक्ष बुधाजी डामसे यांनी दिली.
शाश्वतच्या माध्यमातून बोरघर व आंबे (जुन्नर) येथे दूध डेअरी प्रकल्प चालविला जात आहे. या प्रकल्पातून सुमारे ३०० शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. गाय व म्हशीच्या शेणावर बायोगॅस प्रकल्प राबवून शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने शाश्वत संस्था व आत्मनिर्भर अक्षय ऊर्जा यांच्या मार्फत बायोगॅस प्रकल्प राबविण्याचे ठरले. त्यानुसार आदिवासी भागातील ३९ कुटुंबांची निवड करण्यात आली. या कुटुंबांना राष्ट्रीय बायोगॅस योजनेअंतर्गत राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ मृदा यांच्याकडून प्रतिलाभार्थी २२ हजार रुपयेप्रमाणे अनुदान मिळाले व टाटा मोटर्स यांनी सीएसआर निधीतून प्रतिलाभार्थी ३२ हजार रुपये मदत केली. या बायोगॅस प्रकल्पामुळे शेतकरी कुटुंबांना स्वयंपाक करण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पासाठी गौरव नहार, शंकर भोईर, अनिता असवले, विजय चिमटे, किसन मोरे, शंकर रावते, सुषमा धादवड, उमाताई मते यांचे विशेष परिश्रम लाभले.
बायोगॅस प्रकल्पाचे फायदे
• स्वच्छ इंधन
• सेंद्रिय खत
• पर्यावरण संरक्षण
• स्वच्छता
• आरोग्य
• महिला सक्षमीकरण
• रोजगार निर्मिती
राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्पासाठी आवश्यक गोष्टी
• जमीन
• शेण खत
• तंत्रज्ञान
स्वयंपाकासाठी स्वच्छ आणि स्वस्त इंधन उपलब्ध झाले आहे. तसेच सेंद्रिय खत तयार होत असल्याने रासायनिक खतांवर अवलंबून राहावे लागत नाही. तसेच बायोगॅसमुळे घरात वायू प्रदूषण कमी होते, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या कमी होतात.
- किसन मोरे, लाभार्थी शेतकरी, असाणे (ता. आंबेगाव)
03920