सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : ठाणे पालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विकासकामांमुळे बाधित होणारे वृक्ष तोडण्यास पालिका प्रशासनाकडून परवानगी देण्यात येत आहे. तर दुसरीकडे अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविण्याचा निर्णय घेताना पालिकेच्या शाळा, सुविधा भूखंड, स्मशानभूमीसह पाण्याच्या टाकीखालील परिसरात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती वृक्ष प्राधिकरण विभागाने दिली.
ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण विभाग नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतो. एक ना अनेक कारणांनी या विभागावर लोकप्रतिनिधी, पर्यावरणप्रेमींकडून वारंवार टीका होत असते. त्यामुळेच ठाणे महापालिका प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यानुसार रस्त्याकडेला असलेली उद्याने फुलवण्यावर विशेष भर दिला आहे. याशिवाय नितीन कंपनी येथील उड्डाणपुलावर लावण्यात आलेल्या कुंड्यांमध्ये फुलझाडे लावून उड्डाणपुलावरून प्रवास करण्याची किमया या विभागाने साधली आहे. त्यापाठोपाठ या विभागाकडून शहरातील विविध ठिकाणी देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून अर्बन फॉरेस्ट संकल्पना कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती वृक्ष प्राधिकरण विभागाने दिली आहे. त्यानुसार स्मशानभूमी, उद्याने, पालिका इमारती, कळवा हॉस्पिटल, शाळा, एसटीपी प्रकल्पाच्या ठिकाणी, रस्त्याकडेला वृक्ष लागवड केली जाणार आहे.
----------------------------------------
आंबा, जांभूळ, शेवग्याची लागवड
अर्बन फॉरेस्ट म्हणजे छोटी छोटी जंगले उभी केली जाणार आहेत. या ठिकाणी पक्षी, प्राणी प्रयोजन आखून वृक्षांची लागवड केली जाणार आहे. यात आंबा, जांभूळ आदींसह इतर फळ आणि फुल झाडांचा समावेश असणार आहे. तसेच शेवगा लावला जाणार आहे. यापूर्वी शेवग्याच्या पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. तसेच बांबूची लागवडदेखील विविध ठिकाणी केली जाणार आहे.