JP Nadda : पुढील पाच वर्षात वैद्यकीय शिक्षणाच्या ७५ हजार जागा वाढविणार; केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी. नड्डा यांची माहिती
esakal April 27, 2025 03:45 AM

पुणे - ‘भारतात वैद्यकीय शिक्षण घेऊन विद्यार्थी परदेशात जाऊन प्रॅक्टीस करतात, असे चित्र आहे. त्यामुळे देशाला अधिकाधिक डॉक्टर मिळावेत यासाठी पुढील पाच वर्षात वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या ७५ हजार जागा वाढविल्या जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी गतीने केल्या जातील,’ अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी. नड्डा यांनी दिली.

‘सिंबायोसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन’मधील ‘सिंबायोसिस युनिर्व्हसिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर’च्या नेफ्रोलॉजी व युरॉलॉजी केंद्राचे शनिवारी (ता. २६) नड्डा यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

‘सिंबायोसिस’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां . ब. मुजुमदार, ‘सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठा’च्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रोव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर आणि वैद्यकीय महिला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. टी. विजय सागर यावेळी उपस्थित होते.

नड्डा म्हणाले, ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानकांनुसार (एनडब्ल्यूएएस) सध्या ३० हजार आयुष्यमान आरोग्य मंदिर आहेत आणि आमचे लक्ष्य हे लवकरच १ लाख ७५ हजार आयुष्यमान आरोग्य मंदिरे निर्माण करण्याचे आहे जेणेकरून सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करता येईल, नागरिकांना मोफत उपचार देण्याचे काम सोपे आणि शक्य नाही.

मात्र ही किमया सिंबायोसिसने साध्य केली आहे. प्रधानमंत्री डायलिसिस योजनेच्या माध्यमातून येथील डायलिसिस केंद्राचा उपयोग करत समाजाचा फायदा करण्यासाठी काय करता येर्इल याचा विचार केला जाणार आहे. आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे ९० टक्के नागरिकांवर कॅन्सरचे निदान झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उपचार करण्यात आले आहे.’

डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘नड्डा यांनी महिलांसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे सुचवले होते. त्याच काळात मी डॉ. आनंदी गोपाळ यांच्या कामापासून प्रेरित झालो होतो. त्यामुळे आम्ही हे विद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध देशांत समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. शिक्षण आणि संस्कृती यातून एकत्रित विकसित होत आहे.’

डॉ. विद्या येरवडेकर यांनी प्रास्ताविक केले. कॉलेज सुरू करण्यामागील भूमिका आणि त्यात नड्डा यांचे मार्गदर्शन याबाबतची माहिती त्यांनी दिली. सर्जेना मोहींटी यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉ. टी. विजय सागर यांनी मानले.

सर्वसमावेशक दृष्टीने काम सुरू -

‘२०१७ पूर्वी असलेले आरोग्य धोरण केवळ उपचार करण्यावर भर देत होते. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या. त्यानंतर आम्ही सर्वसमावेशक पद्धतीने योजना तयार करून आजार होणार नाही, यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यातून पुनर्वसनावर भर दिला जाणार आहे,’ असे नड्डा म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.