इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात रविवारी (२७ एप्रिल) मुंबईत सामना होणार आहे. मुंबई या सामन्यातून सलग पाचव्या विजयासाठी प्रयत्न करेल, तर लखनौ देखील विजयी लयीत परण्यासाठी प्रयत्नशील असतील.
सध्या दोन्ही संघ मुंबईत आहेत सराव करत आहेत. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मावरही सर्वांचे लक्ष असणार आहे.
रोहितने गेल्या दोन सामन्यात मोठ्या धावांच्या खेळी केल्या आहेत. सुरुवातीला रोहित फार चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. पण त्याने नंतर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध नाबाद ७६ आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ७० धावांची खेळी केली.
रोहितला अनेक वर्षांचा क्रिकेट खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्याच्याकडून अनेक युवा खेळाडू सल्ले घेतानाही दिसतात. रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी देखील लखनौचा युवा खेळाडू अब्दुल समदने त्याला काही फलंदाजीचे सल्ले विचारले होते. त्यावेळी रोहितने त्याला त्याच्या अनुभवाने आलेल्या गोष्टी सांगितल्या.
रोहित त्याला म्हणाला, 'एकतर या पायाने मार किंवा त्या पायाने, मी असं काय सांगतोय माहितीये का, कारण प्रत्येक खेळपट्टीमध्ये वेग असतो. पण तो प्रत्येक दिवशी वेगळा असतो. जर आज आद्रता जास्त असेल, तर त्यात ओलावा असतो. जर कमी आद्रता असेल आणि हवा खेळती असेल, तर खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली असते. तुला सामना सुरू होईपर्यंत याबाबत समजत नाही.'
रोहितने पुढे सांगितले, 'तुझ्याकडे जी क्षमता आहे, जी प्रतिभा आहे, जे काही तंत्र आहे, त्यानुसार खेळ. काही गोष्टी तंत्राशिवाय होत नाही, हे मान्य करायला हवं. तू माझ्यासारखा खेळू शकत नाही आणि मी तुझ्यासारखा खेळू शकत नाही. तुझ्याकडे तुझी प्रतिभा आहे. जर मी तुझी नक्कल करायला गेलो किंवा तू माझी नक्कल करायला गेला किंवा मी त्याची तंत्र वारले, तर त्यात वेळ निघून जाईल. महत्त्वाचे आहे काय आहे, आत्ता काय आहे.'
रोहित आणि समद यांच्यातील हा संवादाचा व्हिडिओ लखनौ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला अनेक लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
सध्या मुंबई इंडियन्स संघ ९ सामन्यांतील ५ विजयांसह १० गुण मिळवून चौथ्या स्थानी आहे. तसेच लखनौ संघाचे देखील ९ सामन्यांत ५ विजयांसह १० गुण आहेत. पण लखनौ संघाचा नेट रन रेट कमी असल्याने ते ६ व्या क्रमांकावर आहेत. हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत प्रमुख दावेदारांपैकी एक देखील आहेत.