इस्लामाबाद - पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी कराराला स्थगिती दिल्याने पाकिस्तानचे नेते व माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांनी ‘जर पाणी थांबवले तर नद्यांमध्ये रक्त वाहील,’अशी धमकी भारताला दिली आहे.
सिंध प्रांतातील सुक्कुर भागात एका सार्वजनिक सभेत शुक्रवारी (ता. २५) भाषण करताना ते म्हणाले, ‘सिंधू नदी आमची आहे आणि आमचीच राहील.एकतर आमचे पाणी त्यातून वाहील, किंवा त्यांचे रक्त. भारत हा हजारो वर्षे जुन्या संस्कृतीचा वारस असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे, पण ती संस्कृती लरकाना येथील मोहेंजोदडो येथील आहे.
आम्ही तिचे खरे संरक्षक आहोत आणि आम्ही तिचे रक्षण करू. सिंध आणि सिंधूच्या लोकांमधील युगानुयुगाचे जुने नाते मोदी तोडू शकत नाहीत. भारत सरकारने पाकिस्तानच्या पाण्यावर डोळा ठेवला आहे आणि या परिस्थितीत चारही प्रांतांना त्यांच्या पाण्याचे रक्षण आणि संरक्षण करण्यासाठी एकतेची गरज आहे.’
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करताना बिलावल भुट्टो म्हणाले, की मोदींचे युद्धखोरीचे किंवा सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानपासून दूर वळविण्याचे कोणतेही प्रयत्न पाकिस्तानचे नागरिक किंवा आंतरराष्ट्रीय समुदाय सहन करणार नाही. सिंधूवरील दरोडा सहन केला जाणार नाही, असे आम्ही जगाला दाखवून देऊ.
भारतीय आक्रमणापासून त्यांच्या नदीचे रक्षण करण्यासाठी दृढ संघर्षाची तयारी करण्याचे आवाहन त्यांनी समर्थकांना केले. वादग्रस्त सहा नवीन कालव्यांचे बांधकाम सर्व प्रांतांच्या सहमतीने करण्याची तयारी संघीय सरकारने दाखविली असल्याचे भुट्टो म्हणाले.