लग्नाच्या जेवणातून विषबाधा होऊन ६०० जणांची प्रकृती बिघडल्याची धक्कादायक घटना संभाजीनगरमध्ये घडली. कन्नड तालुक्यातील अंबाला येथील ही घटना आहे. विषबाधा झाल्यामुळे एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर १७ जणांची प्रकृती गंभीर आहे. कन्नड तालुक्यातील अंबाळा-ठाकूरवाडीमध्ये सामूहिक विवाहसोहळा पार पडला. याठिकाणी जेवण केल्यानंतर ६०० जणांची प्रकृती बिघडली.
मिळालेल्या माहितीनुसार, च्या कन्नड तालुक्यातील अंबाला येथे ठाकर समाजातील आठ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला होता. दरम्यान या विवाहासाठी आलेल्या विविध गावातील जवळपास 500 ते 600 जणांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. तर यात सुरेश गुलाब मधे या ८ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यातील विषबाधा झालेल्या गंभीर रुग्णांवर छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून इतर रुग्णांवर करंजखेडासह इतर आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुरू आहे.
लग्न सोहळा पार पडल्यानंतर सर्व वऱ्हाडयांना अचानक उलटी आणि चक्कर यायला सुरुवात झाली. यामुळे परिसरातील खासगी तसेच सरकारी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. अनेकांची प्रकृती गंभीर आहे. झाल्याचे कळताच अंबाला येथे एकच खळबळ उडाली. अंबाला येथील ग्रामस्थांसह कळंकी, महादेवखोरा, तांदुळवाडी, घुसुर, निमडोंगरी, शिपघाट, कोळवाडी, खोलापूर, धामडोह, ठाकुरवाडी, कन्नड तालुक्यासह निरगुडी पिंपरी तसेच नाशिक, जळगावमधील ३२ ठाकरवाड्यातील पाहुण्यांनी या लग्नाला हजेरी लावत जेवणाचा आस्वाद घेतला होता.
२६ एप्रिल दुपारी १२ वाजेपासून ज्या लोकांनी लग्नात जेवण केले अशा जवळपास ५०० ते ६०० जणांना उलट्या, जुलाब, चक्कर, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. विवाहसोहळा आटोपून घरी गेल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे ज्या ज्याठिकाणची ही लोकं होती त्यांना स्थानिक ठिकाणीच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, करंजखेड आणि नागापूर येथील आरोग्य केंद्रात आणि खासगी रुग्णालयात १५५ रुग्णांना उपचारासाठी शनिवारी दाखल करण्यात आले होते. करंजखेड येथील आरोग्य केंद्रात उपचारादरम्यान सुरेश मधे या बालकाचा मृत्यू झाला. तर प्रकृती गंभीर असलेल्या भागाबाई बुंधा मेंगाळ, गंगुबाई बुंधा मधे, रखमाबाई लक्ष्मण मथे, वनिता तुकाराम मेंगाळ, काळूबाई मनोज मेंगाळ, आदित्य तुकाराम मेगाळ, गायत्री गुलाब मधे, संदीप मधे यांच्यासह १७ जणांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरेश गुलाब मधे या ८ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.