IPL 2025: विराटचा 'लेट कॉल'! करूण नायरच्या डायरेक्ट हिटने RCB चा कॅप्टन रन आऊट; Viral Video
esakal April 28, 2025 05:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी (२७ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सला ६ विकेट्सने पराभूत केले. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अनेक नाट्यमय घटना घडल्या. यात बंगळुरूच्या कर्णधाराची विकेटही चर्चेचा विषय ठरला.

या सामन्यात दिल्लीने बंगळुरूसमोर विजयासाठी १६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना अक्षर पटेलने तिसऱ्या षटकात जेकॉब बेथल आणि देवदत्त पडिक्कल यांना बाद केले. असं असताना कर्णधार रजत पाटिदार साथ देण्यासाठी आला होता. पण चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गोंधळ झाला.

मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर विराटने मिड-विकेटच्या दिशेने शॉट खेळला. त्यावेळी नॉन-स्ट्रायकरला असलेला पाटिदार धाव घेण्यासाठी धावला. मात्र करुण नायरने चपळाईने चेंडू पकडला, त्यामुळे विराटने पाटिदारला मागे धाडले.

पण परत क्रिजमध्ये येईपर्यंत करुणनने थेट नॉनस्ट्रायकरच्या स्टंपवर चेंडू मारला होता. त्यामुळे पाटिदारला ६ धावांवर धावबाद होऊन माघारी परतावे लागले. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

दरम्यान, पाटिदार बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि कृणाल पांड्या यांनी शतकी भागीदारी करत बंगळुरूच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनीही अर्धशतकेही साकारली. कृणालने ४७ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ७३ धावांची खेळी केली. विराटने ४७ चेंडूत ५१ धावा केल्या. टीम डेव्हिडने नाबाद १९ धावा केल्या. यात ४ चौकार मारले. दिल्लीकडून अक्षर पटेलने २ विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी दिल्लीला प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १६२ धावा केल्या. केएल राहुलने ४१ धावांची खेळी केली. ट्रिस्टन स्टब्सने ३४ धावांची खेळी केली. बाकी कोणाला खास काही करता आले नाही. बंगळुरूकडून भुवनेश्वर कुमारने ३ विकेट्स घेतल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.