Sanjay Gaikwad : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत केलेल्या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. महाराष्ट्र पोलिसांएवढं अकार्यक्षम खातं फक्त भारत नव्हे तर अख्ख्या जगातही नाही. शासनाने पोलीस खात्याशी संबंधित कोणताही कायदा केला की त्यांचा एक हफ्ता वाढतो, असा गंभीर स्वरुपाचा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान, या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत इशारा दिल्यानंतर गायकवाड यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे.
“तुम्ही पाहिलं की मी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही मला फोन आला होता. पण महाराष्ट्रातील संपूर्ण पोलिसांचं धैर्य खचवणं, त्यांचं साहस, धाडस आणि पराक्रम यांचा अपमान करण्याचं नव्हतं. मला जे अनुभव आले होते, तेच अनुभव मी त्या ठिकाणी मांडले होते. माझ्या या शब्दांमुळे महाराष्ट्रातील पोलिसांचे किंवा महाराष्ट्र सरकारची नाचक्की होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो,” असं संजय गायकवाड यांनी म्हटलंय.
गायकवाड यांच्या याच विधानाबाबत नंतर एनकाथ शिंदे यांनीदेखील भाष्य केलं. “पोलीस खाते किंवा एखादे राजकीय क्षेत्र असू द्या त्यामध्ये काही लोक चूक करतात. ज्या माणसांच्या चुका असतील त्यांना दोष दिला तर काहीही अडचण नाही. संजय गायकवाड यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी खुलासा केला की त्यांचा बोलण्याचा उद्देश हा संपूर्ण पोलीस खात्यावर बोलण्याचा नव्हता. कारण पोलीस हे खऱ्या अर्थाने त्याग आणि शौर्याचं प्रतिक आहे,” असं म्हणत शिंदे यांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. पोलिसांबद्दल असं बोलणं योग्य नाही. मी स्वत: एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे की, त्यांनी संजय गायकवाड यांना समज द्यावी. ते वारंवार अशा प्रकारची विधानं करत असतील तर कारवाई केली जाईल, अशी तंबीच फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर संजय गायकवाड यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे.