मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 मध्ये वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सवर 54 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. मुंबईने लखनौला विजयासाठी 216 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईच्या गोलंदाजांसमोर लखनौने गुडघे टेकले. मुंबईने लखनौला 20 ओव्हरमध्ये 161 रन्सवर ऑलआऊट केलं. मुंबईने यासह हा सामना जिंकला. मुंबईचा हा या मोसमातील एकूण सहावा तर सलग पाचवा विजय ठरला. मुंबईने यासह लखनौच्या पराभवाची परतफेड सुद्धा केली. लखनौने मुंबईला 4 एप्रिलला पराभूत केलं होतं. पलटणने या पराभवाचा हिशोब बरोबर केला. तर दुसऱ्या बाजूला लखनौचा हा या मोसमातील पाचवा पराभव ठरला.
लखनौच्या मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बदोनी आणि डेव्हिड मिलर या 4 विस्फोटक फलंदाजांना विजयी धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात मिळाली होती. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी वेळ असतानाच या घातक फलंदाजांना आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. या चौघांव्यतिरिक्त लखनौकडून एकाही फलंदाजांना मुंबईच्या गोलंदाजांनी काही करण्याआधीच रोखलं आणि सामन्यावर घट्ट पकड मिळवली.