इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (२७ एप्रिल) अरुण जेटली स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचे दिसले. त्यातही बंगळुरूकडून खेळणारा विराट कोहली आणि दिल्लीकडून खेळणारा केएल राहुल हे चर्चेचे विषय ठरले.
खंरतर विराट कोहली आणि केएल राहुल हे मैदानाबाहेर चांगले मित्र आहेत. पण असे असले तरी त्यांच्यात या सामन्यावेळी वाद झाल्याचे दिसले. झाले असे की दिल्लीने दिलेल्या १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आणि कृणाल पांड्या बंगळुरूचा डाव सांभाळत होते. बंगळुरूने ३ विकेट्स लवकर गमावल्या होत्या.
त्यामुळे ते दोघे डाव सारवत होते. याचवेळी दिल्लीसाठी यष्टीरक्षण करत असलेल्या आणि विराट यांच्यात काहीतरी बाचाबाची झाली. पण नेमकं कशावरून त्यांच्यात वाद झाले, हे स्पष्ट झाले नाही. कदाचित ७ व्या षटकाला उशीर होत होता, त्यामुळे कदाचित विराट वैतागला होता, त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली असावी.
तथापि, हे वाद सामन्यापुरतेच मर्यादीत होते, कारण नंतर बंगळुरूच्या विजयानंतर विराट केएल राहुलला चिडवताना दिसला होता. नंतर विराट आणि कृणाल या दोघांनीही अर्धशतके झळकावत बंगळुरूचा विजय सोपा केला होता.
जेव्हा बंगळुरूने विजय मिळवला, त्यावेळी विराट बाकी खेळाडूंना भेटून केएल राहुलजवळ आला आणि त्याने हे माझं मैदान असल्यासारखी कृती करत त्याला डिवचलं. पण त्यावेळी कॅमेरे आजुबाजूला असल्याचे पाहात त्याने ते मध्येच थांबवले.
खंरतर विराट दिल्लीच लहानाचा मोठा झाला आहे. त्यामुळे अरुण जेटली स्टेडियम हे त्याचे घरचे मैदान आहे. या मैदानात त्याने अर्धशतक करत बंगळुरूच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
विराटने केएल राहुलसमोर तशी कृती करण्यामागेही एक कारण आहे. याआधी याच हंगामात दिल्ली कॅपिटल्सने १० एप्रिलला बंगळुरूला त्यांच्याच घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पराभूत केले होते. त्यावेळी केएल राहुलने नाबाद ९३ धावांची खेळी केली होती.
त्यानंतर त्याने मैदानावर बॅट गोल फिरवत ठोकली होती आणि हे माझं मैदान असल्याचं सुचित केलं होतं. त्याला या सेलिब्रेशनची प्रेरणा कांतारा चित्रपटातून मिळाल्याचे त्याने सांगितले होते.
राहुल बंगळुरूचा असल्याने त्याच्यासाठी एम चिन्नास्वामी घरचं मैदान होतं. त्यामुळे त्याने ते सेलिब्रेशन केलं होते. पण विराट हे सेलिब्रेशन विसरला नाही. त्याने रविवारी बंगळुरूच्या विजयानंतर केएल राहुलला याची आठवण करून देत डिवचलं.
दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १६२ धावा केल्या. केएल राहुलने ४१ धावा केल्या. त्यानंतर १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूने २० षटकात ४ बाद १६५ धावा केल्या आणि सामना जिंकला. विराटने ४७ चेंडूत ५१ धावा केल्या. कृणालने ४७ चेंडूत ७३ धावांची नाबाद खेळी केली.