Georai News : शेतरस्ता उभ्या पिकातून नेल्याने गेवराईतील शेतक-यांनी गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा, कारवाईची कुटुंबीयाची मागणी
esakal April 28, 2025 06:45 PM

गेवराई : शेतरस्ता एका बाजूने नेण्याची विनंती करुनही संबधितानी उभ्या पिकातून मध्यंतरातून रस्ता नेल्याने गेवराईतील एका वयोवृद्ध शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली.

सुधाकर त्र्यंबक देशपांडे( वय ७९)रा.बंगाली पिंपळा ता. गेवराई जि.बीड असे आत्महत्या केलेल्या वयोवृद्ध शेतक-याचे नाव आहे.बंगाली पिंपळ्यात सध्या रोजगार हमी योजनेंतर्गत शेतवस्त्याचे काम सुरू होते.

हेच काम सुधाकर देशपांडे यांनी शेताच्या मध्यंतरातून न नेता एका बाजूने नेण्याची विनंती केली.एवढेच नाही तर हा शेतरस्ता या ठिकाणाहून नसताना त्यांनी रस्त्याला विरोध केला नाही.फक्त मध्यंतरातून रस्ता न नेता शेताच्या बांधावरून नेण्याची विनंती केली.

मात्र, त्यांच्या या विनंतीला मान देता संबधितानी मध्यंतरातून रस्ता नेल्याने सुधाकर देशपांडे यांनी रविवार(ता २७)मध्यरात्रीनंतर बंगाली पिंपळ्याच्या गावखोर मधील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली.

आज सकाळी चकलांबा पोलिस घटस्थळावर दाखल झाले.मृत सुधाकर देशपांडे यांच्या मृतदेहाचा पंचानामा करुन मृतदेह चंकलांबा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यास पाठविण्यात आला असून,पोलिस तपासत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे समोर आले तर त्यानुसारच गुन्हा दाखल करण्यात येईल असे एपीआय संदीप पाटील यांनी सांगीतले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.