मालाडमध्ये गाळ सुकून रस्त्यावर
मालाड, ता. २८ (बातमीदार) ः मालाड पश्चिमेतील मालवणीतील शहीद अब्दुल हमीद रस्त्यावर ठिकठिकाणी गटारातून काढलेला गाळ पडून आहे. पालिकेच्या कंत्राटदाराने गटारांतील गाळ उपसून पंधरा दिवस उलटले तरी गाळाची विल्हेवाट लावलेली नाही. त्यामुळे हा गाळ सुकून रस्त्यावर इतरत्र पसरला आहे. अनेक ठिकाणी या गाळासह बाहेर काढलेला कचरा आणि प्लॅस्टिक पुन्हा रस्त्यावर पसरले आहे. गाळ पुन्हा गटारात जात असल्याने पावसाळ्यात गटारे तुंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे.