राजस्थान रॉयल्सचा युवा 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी या फलंदाजाने सोमवारी 28 एप्रिलला इतिहास घडवला. वैभवने गुजरात टायटन्स विरुद्ध वादळी शतकी खेळी केली. वैभवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडणाऱ्या आणि अधिराज्य गाजवणाऱ्या गोलंदाजांची धुलाई करत अवघ्या तिसऱ्याच सामन्यात आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक झळकावलं. विशेष बाब म्हणजे वैभवने विजयी धावांचा पाठलाग करत असताना हे शतक केलं. वैभवचं हे शतक खास, अविस्मरणीय, अप्रतिम आणि ऐतिहासिक असं ठरलं. वैभवने फक्त 35 चेंडूत हे शतक पूर्ण केलं आणि विक्रमाला गवसणी घातली.
वैभवने अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक आणि त्यानंतर पुढील 18 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. वैभवने 11 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. वैभवने 35 चेंडूत शेकडा पूर्ण केला. वैभव यासह आयपीएल इतिहासात वेगवान शतक करणारा पहिला भारतीय आणि एकूण दुसरा फलंदाज ठरला. वैभवने यूसुफ पठाण याचा विक्रम मोडीत काढला. यूसुफने 37 चेंडूत शतक केलं होतं. तर आयपीएलमध्ये वेगवान शतक करण्याचा रेकॉर्ड ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेलने 30 चेंडूत शतक केलंय.
वैभवने केलेल्या शतकी खेळीमुळे राजस्थानने 210 धावांचं आव्हान हे सहज 25 बॉल राखून आणि 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. वैभव व्यतिरिक्त यशस्वी जयस्वाल याने नाबाद 70 धावांची खेळी केली. तर कर्णधार रियान परागने नॉट आऊट 32 रन्स केल्या. मात्र वैभवच राजस्थानच्या विजयाचा खरा हिरो ठरला. या खेळीनंतर सारा सोशल मीडिया वैभवमय झाला आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून वैभवच्या या खेळीचं कौतुक केलं जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा यानेही वैभवच्या या खेळीचं कौतुक केलं आहे.
वैभवचं कौतुक करणारी रोहितची इंस्टा स्टोरी
रोहित शर्मा याने सोशल मीडियावरुन पोस्ट करत वैभवच्या खेळीवर भाष्य केलं आहे. रोहितने इंस्टा स्टोरीतून वैभवचा फोटो पोस्ट केलाय. तसेच रोहितने वैभवच्या या खेळीचा एका शब्दात उल्लेख करत भरभरुन कौतुक केलंय. रोहितने वैभवच्या या खेळीचा उल्लेख हा क्लास म्हणजेच ‘दर्जा’ असा केला आहे. रोहित सारख्या दिग्गज आणि वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराने वैभवचं कौतुक केलं. त्यामुळे वैभव सारख्या युवा फलंदाजाला आणखी काय हवं? असं म्हटलं जात आहे.