Indian Navy : जहाजांवरून 'राफेल' गर्जना, फ्रान्स सरकारशी करार; नौदलात २०३१ पर्यंत येणार
esakal April 29, 2025 08:45 AM

नवी दिल्ली : पहलगामममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने संरक्षणसज्जतेमध्ये आणखी भर घालायला सुरुवात केली आहे. आता नौदलासाठी राफेल-एम ही लढाऊ विमाने खरेदी केली जाणार आहेत. फ्रान्ससोबत त्यासाठी ६३ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. यातील २२ विमाने ही एक आसनी असून अन्य चार विमाने दोन आसनी प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी आहेत. ही विमाने २०३१ च्या अखेरपर्यंत नौदलास मिळतील.

‘राफेल-एम’ हे नौदलासाठीचे जगातील सर्वाधिक अत्याधुनिक लढाऊ विमान म्हणून ओळखले जाते. ते सध्या केवळ फ्रान्सच्या नौदलाकडेच आहे. या विमानांच्या खरेदीला अलीकडेच केंद्र सरकारने मंजुरी दिली होती. या करारावर शिक्कामोर्तब करताना संरक्षण खात्याचे सचिव राजेशकुमार सिंह, नौदलाचे उपप्रमुख ॲडमिरल के. स्वामिनाथन हे उपस्थित होते.

या विमान खरेदीच्या अनुषंगाने भारत आणि फ्रान्स सरकार यांच्यात थेट करार झाला आहे, हे याचे

आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल . ‘मोदी-१’ सरकारच्या कार्यकाळात २०१६ मध्ये भारताने फ्रान्सकडून ३६ राफेल विमानांची खरेदी केली होती. सध्या ही विमाने हवाई दलाच्या अंबाला आणि हाशिमारा हवाईतळावर तैनात आहेत.

मागील वर्षी नियमांत बदल

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण साहित्य खरेदी परिषदेच्या (डीएसी) गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत ‘राफेल -एम’ विमाने खरेदी करण्याच्या अनुषंगाने नियमांत आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या होत्या. नौदलाच्या ताफ्यात सध्या चाळीस ‘मिग २९ - के’ ही विमाने आहेत. साधारणपणे २००९ पासून रशियाकडून या विमानांची खरेदी केली जात होती. मात्र ही विमाने जुनी झाल्याने त्याजागी ‘राफेल-एम’ विमानांची तैनाती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सुटे भाग भारत बनविणार

फ्रान्सची ‘डसॉल्ट एव्हिएशन’ नावाची कंपनी राफेल विमानांची निर्मिती करते. आयएनएस विक्रांत, आयएनएस विक्रमादित्य यासारख्या लढाऊ जहाजांवर राफेल- एम ची तैनाती केली जाणार आहे. या विमानांची देखभाल, लॉजिस्टिक सपोर्ट, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण याची जबाबदारी फ्रान्स सरकारची असेल. विशेष म्हणजे या विमानांचे सुटे भाग आणि उपकरणांची निर्मिती भारतात केली जाणार आहे.

पंतप्रधानांच्या भेटीस संरक्षणमंत्री

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाईची शक्यता बळावली असताना संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या भेटीचा नेमका तपशील समजला नसला तरी संरक्षणमंत्र्यांनी या भेटीदरम्यान पहलगाम भागात दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या लष्कराच्या मोहिमेची माहिती पंतप्रधानांना दिल्याचे समजते. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड सुमारे ४० मिनिटे चर्चा झाली.

पाककडून चौथ्या दिवशीही गोळीबार

जम्मू : पाकिस्तानी सैन्याने आज सलग चौथ्या दिवशी सीमेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचा भंग केला. शत्रूसैन्याने जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा आणि पूँच जिल्ह्यात गोळीबार केला. या गोळीबाराला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव वाढला असून पाकिस्तानकडून कुपवाडा, राजौरी आणि पूँच भागात सलग गोळीबार सुरू आहे. रविवारी रात्रीही पाकिस्तानी सैन्याने सीमेवरील भारतीय जवानांच्या ठाण्यांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात कोणतीही हानी झाली नाही. भारतीय जवानांनीही तातडीने प्रत्युत्तर दिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.