India Attack Possibility : ''भारत कधीही हल्ला करू शकतो, सैन्य अलर्टवर; खुद्द पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनाच धडकी!
Sarkarnama April 29, 2025 08:45 AM

Pakistan Defense minister Khawaja Asif Statement: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबधांमध्ये टोकाचा तणाव निर्माण झालेला आहे. दोन्ही देशांमध्येही कधीही युद्ध सुरू होण्याची चिन्ह आहेत. भारताने तर या हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना सोडलं जाणार नाही, असं म्हणत दहशतवाद्यांसोबतच एकप्रकारे पाकिस्तानलाही सूचक इशारा दिलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानला चांगलीच धडकी भरलेली आहे. 

आता खुद्द पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद यांनीच भारत कधीही हल्ला करू शकतो, सैन्याला अर्लटवर ठेवण्यात आलेलं आहे, अशी भीती बोलून दाखवली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्येही एकच खळबळ माजलेली आहे. दुसरीकडे भारताने सीमेवर जोरदार तयारी केलेली दिसून येत आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी म्हटले आहे की, मागील आठवड्यात काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे दोन्ही अणवस्त्रधारी देशांमध्ये तणाव वाढलेला आहे. तसेच, आम्ही आमच्या सैन्याला मजबूत केले आहे, कारण आताच्या परिस्थितीत ते गरजेचं झालेलं आहे. अशा स्थितीत काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात, त्यामुळे ते निर्णय घेतले गेले आहेत.असंही त्यांनी सांगितलं.

ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तान पूर्णपणे सतर्क आहे आणि तो आपल्या अणवस्त्राचा वापर तेव्हाच करेल जेव्हा आमच्या अस्तित्वाला थेट धोका असेल. पाकिस्तानने या आधी पहलगाम हल्ल्याच्या तपासासाठी रशिया आणि चीनला सहभागी करून घेण्याची मागणी केलेली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.