संविधानाचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला ः दरेकर
मुंबई, ता. २८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा आदर आणि सन्मान करण्याचे काम केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशात संविधान दिन साजरा करण्याचे काम मोदींच्या माध्यमातून झाले असल्याचे प्रतिपादन भाजप विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे.
कांदिवली पूर्वेतील आकुर्ली म्हाडा वसाहत, लोखंडवाला कॉम्प्लेक्स जयंती उत्सव समितीतर्फे रविवारी (ता. २७) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती साजरी करण्यात आली. या वेळी दरेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमांच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेबांची आठवण, ऊर्जा आपण घेऊन जात असतो. मी तर बाबासाहेबांच्या विचारांचा निस्सीम भक्त आहे. माझे महाविद्यालयीन जीवन सिद्धार्थ महाविद्यालयात गेले. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांचा वेगळा पगडा माझ्या मनामध्ये निश्चित आहे. म्हणून या समाजाच्या हितासाठी, उत्कर्षासाठी जेव्हा जेव्हा जे योगदान द्यायचे असते तेथे मी आपला भाऊ म्हणून सोबत राहिलेलो आहे. आज आपण जयंती उत्सव साजरा करतोय. छत्रपती शिवरायांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वागले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यावर अनंत उपकार केलेत. ज्या-ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पावले लागली आहेत, त्या पंचतीर्थालाही आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान देण्याचे काम होत असल्याचे दरेकर म्हणाले.